थकीत वीजबिलामुळे टाकळीभानकरांना पाण्यासाठी पायपीट

..तर गाळ्यांना सील ठोकणार!
“”ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. थकबाकीदारांनी अनेकवेळा प्रत्यक्ष भेटून कराची मागणी केली आहे. कायदेशीर नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र, थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गाळे अनामत व गाळेभाड्याच्या वसुलीसाठी पोलीस संरक्षणात गाळे सील करण्यात येणार आहेत, तर अनामत रकमेची थकबाकी असणारांचे गाळे ताब्यात घेऊन फेरलिलाव केले जाणार आहेत. तर, अनधिकृत व थकीत नळजोडण्या तोडण्याचे काम हाती घेतले जात आहे. थकीत कराच्या वसुलीतून महावितरणचे वीजबिल भरूनच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल.” आर. एफ. जाधव (ग्रामविकास अधिकारी, टाकळीभान)

टाकळीभान – महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीच्या कचाट्यात सापडलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची वीज पुन्हा एकदा खंडित करण्यात आली आहे. उन्हाचे चटके बसू लागले असतानाच ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होऊ लागला आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 12 लाख 18 हजारांच्या महावितरणच्या थकबाकीपोटी पाणीपुरवठ्याचा वीजप्रवाह खंडित करण्याची ही 2018 मधील दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात 22 फेब्रुवारीला वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 30 अश्वशक्तीच्या 5 विद्युत मोटारींद्वारे गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या महिन्यात 30 हजारांची मलमपट्टी करून तात्पुरता वीजप्रवाह सुरळीत करण्यात आला होता. मात्र, आता मार्च एन्ड येताच महावितरण कंपनीने पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याचे हत्यार उपसल्याने गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

वीजबिलाची थकीत रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट असल्याने नागरिकांकडील थकीत कराच्या वसुलीसाठी प्रयत्न होत असले तरी मोठे थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याने थकीत वीजबिल भरण्याचे संकट ग्रामपंचायत प्रशासनापुढे उभे राहिले आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाल्याने वातावरण चांगलेच तापलेले आहे आणि त्यातच पाण्यासाठी पायपीट करण्याची पाळी नागरिकांवर आल्याने वेळेत कराचा भरणा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. ग्रामपंचायतीची नागरिकांकडे व्यापारी गाळे अनामत, गाळा भाडे, पाणीपट्टी, घरपट्टी व इतर करांची 10 लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे. सर्वसामान्य नागरिकांचा दाखले व उतारे घेण्यासाठी नेहमी संपर्क येत असल्याने सर्वसामान्यांकडून कराची वसुली केली जाते. मात्र, व्हाईट कॉलर पुढाऱ्यांच्या कॉलरला हात लावण्याचे धारिष्ट्य ग्रामपंचायत प्रशासनाकडे नसल्याने व मतांचे राजकारण करण्याचा हेतू ठेवून कराची वसुली होत असल्याने थकबाकीचा आकडा फुगलेला आहे. त्यामुळे व्हाईट कॉलर पुढाऱ्यांवर सक्तीची करवसुलीची मोहीम राबवून महावितरणची थकबाकी भरून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबवावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)