थकबाकी वसुलीसाठी पालिकेने कसली कंबर

प्रशासन करणार वसुलीचा कृती आराखडा प्रभात वृत्तसेवा

पुणे – महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. मात्र, त्याच वेळी खर्चाचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन मार्चमध्येच शहरात थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी ज्या विभागांची थकबाकी अधिक आहे, अशा विभाग प्रमुखांची बैठक अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी बैठक बोलाविली असून या वसुलीसाठी महिनाभराचा कृती आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांची सुमारे 3 हजार 700 कोटींची थकबाकी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकाने साडेसहा हजार कोटींचा टप्पा गाठलेला असला, तरी प्रत्यक्षात महापालिकेस अजूनही 4 हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्प्पा अजूनही गाठता आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेस सुमारे 2 हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट येत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी पालिकेला वसूल करता येऊ शकणारी थकबाकीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी पालिकेकडून वेगवेगळया उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी राजकीय मध्यस्थी करून अनेकांकडून थकबाकी भरली जात नसल्याचे चित्र आहे. तसेच निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधींकडून अभय योजना राबविली जाईल आणि मिळकतकरात सवलत मिळेल यामुळे नागरिक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी प्रमुख थकबाकी असलेल्या विभागांची बैठक बोलाविली आहे. त्यात मिळकतकर विभागाची 3,200 कोटी, पाणीपुरवठा विभागाची 550 कोटी, मालमत्ता व्यवस्थापन विभागाची 15 कोटी तर झोपडपट्टी सेवा शुल्काची तब्बल 16 कोटींची थकबाकी आहे. या सर्व विभाग प्रमुखांना थकबाकीची माहितीसह वसूल न होण्याची कारणे तसेच पुढील महिनाभरात वसुलीसाठी काय उपाय योजना राबविल्या जाणार याचा अहवाल या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, या माहितीवरून दि.1 ते 31 मार्च या कालावधीत थकबाकी वसूलीसाठी प्रत्येक विभागास उद्दिष्ट देऊन विशेष कृती कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

अशी आहे प्रमुख विभागांची थकबाकी
मिळकतकर – 3,200 कोटी
पाणीपट्टी – 550 कोटी
मालमत्ता व्यवस्थापन – 15 कोटी
सेवा शुल्क – 16 कोटी
अतिक्रमण विभाग- 5 कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)