थंडीमुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता

पुणे – शहरासह जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही, त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांनी शहरातील थंडीचा कडाका वाढणार असल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यासारखे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून आले. चार दिवसांत साधारण 8 ते 10 हजार व्यक्‍तींच्या तपासणीतून एकही व्यक्‍ती स्वाईन फ्लूचा आढळून आला नाही, तर दोनशेच्या आसपास संशयित रुग्णांना टॅमीफ्लूची औषधे देऊन घरी सोडण्यात आले. शहरात स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दहा महिन्यात 557 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यामध्ये काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले होते. मागील दोन दिवसांत 3 हजार व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 80 संशयित रुग्णांना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले. दरम्यान, अतिदक्षता विभागात 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 25 वर होती, ती आता 4 वर आली आहे.

-Ads-

पुणे जिल्ह्यातही दोन महिन्यांत 8 व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून 94 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. शहरात दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी असे हवामान अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, थंडीचा कडाका वाढल्यानंतर आणि ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधून बाहेर पडावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)