त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार

सौंदर्य हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषतः महिला सौंदर्याचा विचार अनेक करतात. तेजस्वी कांती असावी असे सर्वांनाच वाटत असते. त्वचेवर येणारा डाग किंवा फोड ही त्यांना त्रासदायक ठरणारी असतो. अनेकदा त्वचेचा काळेपणा अधिक वाढतो. उन्हाळ्या-पावसाळ्यात त्वचेची आणि त्यातली त्यात विशेषतः चेहऱ्याची काळजी अधिक घ्यावी लागते. उन्हात जाताना तोंडाला आणि डोक्‍याला स्कार्फ बांधावा, टोपी घालावी, छत्री वापरावी, त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेकविध उपाय सांगितले आहेत.
उन्हाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलेला असतो. त्यामुळे पोटातून साजूक तूप घ्यावे, चेहरा थंड पाण्याने किंवा गुलाब पाण्याने धुतला तर आणखी चांगले असते. शतधौत घृताने चेहऱ्याच्या ठिकाणी मालिश करावी. शतधौतघृताचा उपयोग मॉयश्‍चरायजर व स्क्रीन म्हणून थंडी आणि उन्हाळ्यामध्ये वापरता येते.
चेहऱ्यावर किंवा इतरत्र कुठेही काळेपणा असेल, तर त्या ठिकाणी हळद, चंदन, मुल्तानी माती यांचा लेप लावावा. लेप दिवसा लावावा. लेप रात्री लावू नये. लेप सुकल्यानंतर लगेच काढावा. लेप काढल्यानंतर शतधौत धृत त्या ठिकाणी लावावे म्हणजे कोरडेपणा येत नाही आणि चेहऱ्याचा रंगही सुधारण्यास मदत होते. पोटातून याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. ही औषधे रक्तशुद्धी करण्यास मदत करतात. त्वचेच्या ठिकाणी असणारा काळेपणा किंवा फोड हे मुख्यत्वे रक्तदोषामुळे असतात. सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्‌यानुसारच घ्यावीत,
त्वचेच्या ठिकाणी खाज येणे किंवा ऍलर्जी ही मुख्य आढळणारी समस्या आहे. त्याकरिता रक्तशुद्धी करणारी औषधे घ्यावीत आणि पंचकर्म चिकित्सा वैद्यकीय सल्ल्‌यानुसार करून घ्यावीत. आयुर्वेदामध्ये औषधांबरोबर पंचकर्म चिकित्सेलाही महत्त्व दिलेले आहे. आयुर्वेद हे शरीरशुद्धीला महत्त्व देणारे शास्त्र आहे. शरीरात साठलेले दोष शरीराबाहेर काढले तर ते पुन्हा त्रास देत नाहीत. पंचकर्मापैकी पहिले कर्म वमन आहे. त्वचा विकारांसाठी वमन ही चिकित्सा अत्यंत उपयुक्त ठरते. वमनासाठी आधी प्रकृतीनुसार 3, 5, 7 दिवस तूप घ्यावे लागते. त्यानंतर उलटीचे औषध देतात.
वमनानंतर येणारा उपक्रम म्हणजे विरेचन आहे. विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध आहे. यासाठीही शरीराची पूर्वतयारी म्हणून तूप प्यावे लागते. त्यानंतर येणारा उपक्रम म्हणजे नस्य (नाकात औषध टाकणे) ही चिकित्सा डोळ्याखालील काळी वर्तुळे, वांग काढण्यासाठी उपयुक्त ठरते. नस्यासाठी गाईचे तूप, बलातेल, खोबरेल तेल इत्यादी वापरावे. चेहऱ्याच्या ठिकाणी मसाज (अभ्यंग) करावा. पूर्ण शरीराचाही मसाज (अभ्यंग) करावा आणि वाफ घ्यावी. अभ्यांगासाठी तेल, तीळतेल वापरावे, मात्र तेही वैद्यकीय मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.
नस्यानंतर येणारा उपक्रम म्हणजे बस्ती आहे. विशेषतः क्षीरबस्ती (दूधाची बस्ती) किंवा तेलाचा बस्ती हे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी व आऱोग्य सुधारण्यासाठी उपयोगी पडतात. त्यानंतर रक्तमोक्षण करावे. म्हणजे दुष्टरक्त शरीराबाहेर काढणे. रक्तमोक्षणासाठी जळू वापरले जाते किंवा शिरेमधून सुईद्वारे रक्त बाहेर काढून टाकतात.
पंचकर्म ही वैद्यकीय सल्ल्‌यानुसारच करून घ्यावीत. कारण सगळी पंचकर्म ही प्रत्येकाला करण्याची गरज नसते किंवा प्रत्येकाला करता येत नाहीत. रुग्णांची प्रकृती, आजाराची स्थिती, शरीराची ताकद यानुसार कर्म करावी लागतात. त्यामुळे ती वैद्यकीय सल्ल्‌यानुसार करणे इष्ट ठरते.
आयुर्वेदामध्ये औषधांबरोबर आहारदेखील खूप महत्त्व दिलेआहे. सध्याच्या काळातील खाण्यापिण्याच्या सवयी, हॉटेलिंग, फास्टफूड, सततचा कामाचा ताण याचा परिणाम शरीरावर विशेषतः त्वचेवर होतो.आहारात सात्विक आहार ठेवणे महत्त्वाचे आहे. सात्विक आहार म्हणजे गाईचे दूध पिणे, तूप खाणे, कमी तिखट, कमी तेलकट भाज्या आहारामधये असाव्यात. तसेच भाज्यांमध्ये पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश असावा. डाळींमध्ये मूग, मसूर यांचा वापर अधिक केला पाहिजे. तसेच फळांमध्ये डाळिंब, सफरचंद, आंबा, तसेच त्या त्या ऋतुमध्ये उपलब्ध होणारी फळे खावीत. सुकामेवा (काजू, बदाम, खजूर, काळे मनुके, तसेच पाण्याचे सरबतांचे प्रमाण अधिक ठेवणे शरीरासाठी पोषक ठरते.
जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. शिळे अन्न शक्‍यतो खावू नयेत. सूर्यास्तानंतर शक्‍यतो काही खावू नये. सूर्यास्तानंतर भूक लागली, तर दूध किंवा फळे खावीत. मन प्रसन्न असेल, तर शरीरकांतीही वाढण्यास मदत होते. सतत मन प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन सतत गुंतवावे. सतत तणाव असेल, तर झोप लागत नाही. त्यामुळे शरीरावर काळेपणा येतो. त्यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा ही चिकित्सा सांगितलेली आहे. शिरोधारा म्हणजे डोक्‍यावर तेलाची धार सोडणे होय. शिरोधारेनेही त्वचेचा रंग, कांती सुधारण्यास मदत होते. आरोग्य उत्तम असेल, तर त्वचा ही निरोगी राहते. तेजस्वी कांतीने सौंदर्य अधिक खुलून दिसते. आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)