त्रिशतकी वन डे लढतीत धोनीच्या कामगिरीकडे लक्ष

भारत-श्रीलंका आज चौथी वन डे
कोलंबो – पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अगोदरच 3-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्ध उद्या (गुरुवार) होणारा चौथा सामना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी ठरेल. आपल्या संस्मरणीय कारकिर्दीतील 300 वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हेच या सामन्यात क्रिकेटशौकिनांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे. कसोटी आणि वन डे मालिकेत भारतीय संघाला क्‍वचितच तोलामोलाची झुंज देऊ शकणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध संस्मरणीय कामगिरी करण्याची धोनीला संधी आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम “फिनिशर’पैकी एक असा लौकिक मिळविणाऱ्या धोनीसाठी गेल्या दीड-दोन वर्षांचा काळ फारसा चांगला गेला नव्हता. विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनीने नंतर मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्वही सोडले. परंतु त्याची वैयक्‍तिक कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. श्रीलंकेच्या या दौऱ्यात मात्र त्याने आपले महत्त्व दाखवून दिले.

धोनीने गेल्या दोन सामन्यांत भारताची घसरगुंडी होत असताना बहुमोल खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने प्रचंड दडपणाखाली असताना 45 आणि 67 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देताना आपण अद्याप संपलो नसल्याचे सिद्ध केले. त्यामुळेच त्याची नजर 2019 विश्‍वचषक स्पर्धेकडे असल्याचेही दिसून आले.

या दोन्ही खेळी करताना त्याने भुवनेश्‍वर कुमार आणि रोहित शर्माला साथ देण्याची दुय्यम भूमिकाही चोख निभावली आणि तो नव्या भूमिकेतही महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो हे सर्वांना दिसून आले. तसेच भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविणारा श्रीलंकेचा “मिस्टरी स्पिनर’ अकिला धनंजया हा धोनीवर काहीच प्रभाव पाडू शकला नाही, हेही दिसून आले.
आता त्रिशतकी सामना खेळताना धोनी भारताच्या “क्‍लब-300′ या प्रतिष्ठेच्या क्‍लबमध्ये दाखल होणार आहे. तो या क्‍लबमधील सहावा सदस्य ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर (463 सामने), राहुल द्रविड (344), महंमद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (311) आणि युवराज सिंग (304) या पाच भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.
कोहली आणि लोकेश राहुल यांचीही कामगिरी घसरली आहे. या दोघांनाही आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. तसेच सलग दोन वेळा भोपळाही न फोडता तंबूत परतलेल्या केदार जाधवलाही पुन्हा संधी मिळाल्यास आपली किंमत सिद्ध करावी लागेल. दोन्ही वेळा तो धनंजयाचा बळी ठरला. पहिल्या वेळी तो गुगलीला फसला आणि दुसऱ्यांदा त्याला टप्पाच समजला नाही. आता केदारच्या जागी पांडेला संधी देण्याचा विचार संघव्यवस्थापन करीत असल्यास त्यांना दोष देता येणार नाही. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार यांना वगळता येणार नाही. कुलदीप यादवला संधी दिल्यास त्यासाठी अक्षर पटेल किंवा यजुवेंद्र चाहल यापैकी एकाला वगळावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ-
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्‍य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीात बुमराह, भुवनेश्‍वर कुमार व शार्दूल ठाकूर.
श्रीलंका- उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, चमारा कपुगेदरा, मिलिंद सिरिवर्धना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चमीरा व विश्‍वा फर्नांडो.
सामन्याचे ठिकाण- कोलंबो. सामन्याची वेळ- दुपारी 2-30 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)