त्रिवेणी संगम…लेखणी, डायरी नि मनाचा

माझं मन आज खट्टू झालं होतं, माझ्यावरच. दिवसातून हजारदा ओरडून तक्रार करत होतं, “बरेच दिवस मी काही बोललोच नाहीये, व्यक्त झालो नाहीये आणि याला कारणीभूत तू आहेस’, असं चिडून सांगत होतं.
ते कोपऱ्यातलं फडताळ दिसतंय का? हो, तेच ते. इंजिनिअरिंगचे ठोकळे… ओ सॉरी…बुक्‍स आपल्या पोटात सामावून धूळ खात पडलेलं. हो, ते लाकडाचंच…त्या फडताळावर एक लेखणी चकाकतीये…दिसली? मस्त आहे ना? जाम आवडते ती मला. पण ती लेखणीसुध्दा रुसलीये हो माझ्यावर… खूप दिवस हातच लावला नाहीये ना तिला. रुसणारंच ती! त्या लेखणी-शेजारीच एक डायरी आहे बघा. काहीशी निळसर-राखाडी. हो, तिच… चंदेरी काठ असलेली. तिचं नि माझं घट्ट नातं आहे. त्या नात्याचं नाव मात्र मला काही ठाऊक नाही, पण नाते मजबूत आहे. माझ्या विचारांचा तिला बऱ्यापैकी ठावठिकाणा माहीत आहे. माझ्या विचार-कल्लोळांना तिने तरलता दिली आहे. माझ्या भाव-भावनांना तिने अगदी अलगदपणे, माझ्याही नकळत आपलंसं केलं आहे. इतकंच नाही, माझ्या अनेक आठवणींशी ती डायरी खूपच सहजतेने एकरुप झाली आहे. खरं तर, प्रेम आहे माझं तिच्यावर… तिच्यासोबत जुळलेल्या एका भावनिक-वैचारिक बंधनावर.

अरेच्चा ! हे, काय ? इतकी एकटक ती माझ्याकडे का बरं बघतीये? माझ्या प्रिय डायरीचे डोळे इतके आतुर व केविलवाणे का भासत आहेत? छे ! भासच हा ! नाही-नाही… तिचे, माझ्या प्रिय डायरीचे नेत्र तर बघा ! जणू ते मला विचारु पाहताहेत, “हे प्रिये, विसरली तर नाही ना ? बरेच दिवस तू माझी विचारपूसदेखील केली नाहियेस. माझं पान्‌ नि पान तुझ्या भेटीसाठी आसुसलं आहे गं. तुझी भेट कधी होईल, हे तरी कळू दे गं त्यांना म्हणजे ते निश्‍चिंत होतील. इतकं कळालं तर ते थोडीतरी विश्रांती घेतील. तुझी वाट पाहून पाहून पार थकून गेलेत गं ते. सांग, कधी भेटते आहेस आम्हांला ? सांगते आहेस ना ? अगं… कोठे हरवलीस? मी तुझ्याशी बोलतीये… सखे…”, माझी प्रिय सखी उद्विग्न होऊन बोलतच होती. मी मात्र मूक झाले होते…किंबहुना अंतर्मुख झाले होते.

कित्येकदा माझं मन, माझी लाडकी डायरी व लेखणी या त्रिकुटांचा त्रिवेणी संगम होत असतो. अनेकदा भावना अनावर झाल्या की हे चंचल मन लेखणीच्या मदतीने डायरी जवळ मोकळं होतं. अगदी हलकं होतं. अनावर झालेल्या भावनांच्या पुरात मग माझी प्रिय डायरी न्हाऊन निघते आणि लेखणी वाहतच जाते. त्यावेळी तिला बांध घालणं मलाही अशक्‍य असतं.
पण काही वेळा कित्येक दिवस आमची भेटच होत नाही. त्यांनाही माहीत आहे, मला ठरवून भेट घेणं नाही जमत तितकंसं. आमची भेट ही बहुधा नैसर्गिकच असते आणि त्या भेटीत अनेक भावरसांचा ओलावा असतो.

माझ्या मनाची असंख्य नाटकं लेखणी व डायरी या माझ्या सख्यांनी बघितली आहेत. खरोखरच महाविचित्र महाभाग आहे तो. कधी या दोघींशी वैचारिक धुमशान घालतो. कधी प्रेमाने,भावनिक आपुलकीने यांच्याशी जोडला जातो. बऱ्याचदा तात्त्विक पातळीवर डायरीशी तुडुंब गप्पागोष्टी करतो. इतकेच नाही, बऱ्याचदा बऱ्याच योजनांची आखणी या सख्यांच्या सल्लामसलतीनेच होते. कधी तर मनाच्या विषण्णतेला या मैत्रिणी बळी पडतात. डायरीची पाने त्वेषाने हे मन तिच्यापासून अलग करतं, पण ती बिचारी निमूटपणे सगळं सांभाळून घेते. कारण त्यानंतर हेच मन भावनांचा आवेष ओसरताना अश्रूंनी तिची पानं भिजवत तिच्याच कुशीत शांत होणार आहे, हे ती जाणून आहे. मनाच्या असंख्य वैचारिक नि भावनिक मंथनांच्या या दोन्ही सख्या साक्षीदार व भागीदारही आहेत.

आपल्या या जोडीदारांसोबत शेअर केलेल्या आठवणी पुन्हा एकदा मनाच्या गाभाऱ्यात घुमू लागल्या. माझ्या डोळ्यांसमोर अनेक गतघटना तरळू लागल्या आणि पुन्हा एकदा मनाने उचल खाल्ली. माझ्याही नकळत माझे पाय त्या लाकडी फडताळाकडे वळले. रूसलेली लेखणी खुदकन्‌ हसली. प्रिय डायरीचे आतुर डोळे आनंदाने चमकले अन्‌ खट्टू झालेलं कलंदर मन मोठ्या हर्षाने त्यांच्याकडे धावू लागलं. आमच्या प्रिय सख्यांना कुशीत घेण्याकरिता… त्रिवेणी संगम गाठण्याकरिता… 🙂
– स्नेहल रोहोकले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)