पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात शून्य कचरा व्यवस्थापन मोहीम सुरु आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी कंपोस्ट खत तयार करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. सरसकट जो कोणी व्यक्ती (कुटुंब) बंगला, सदनिका, छोट्या गृह सोसायटी आदी मधील ओला कचरा आपल्या घरातच कंपोस्ट करेल त्याला सामान्य करात पाच टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीने (इसिए) महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आदर्श सोसायटी स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत ठेवण्यात आली. त्यानंतर कोणी असे केले असेल तर त्याला सवलत दिली नाही. हे धोरण मुळ उध्येशाला धरून नाही. अनेक सोसायट्यांनी शून्य कचरा या विषयावर काम सुरु केले आहे. परंतु, 31 मार्चच्या डेडलाईनमुळे त्यांची नाराजी दिसून येत आहे.
महापालिकेने स्पर्धा घेऊन काही मोजक्या सोसायट्यांना सवलत द्यायचे हे धोरण योग्य नाही. सरसकट ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून ओला कचरा जागेवरच कंपोस्ट करेल मग तो बंगला असो अथवा सोसायटी असेल अथवा कंपनी किव्हा सदनिका असो, शून्य कचरा या चळवळीला जो कोणी स्वतः अमलात आणील त्या सगळ्यांना सवलत देण्यात यावी. त्याच्या सत्यता तपासणीसाठी एक स्वतंत्र समिती नेमावी, अशीही मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा