‘त्या’ सेवकाच्या कुटुंबियांना मिळणार 5 लाख

विद्यापीठ देणार शिक्षक, कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून अटी, शर्तीही ठरविण्यात आलेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठात कर्तव्य बजावत असताना शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना विद्यापीठ निधीतून 5 लाख रुपये एकरक्‍कमी आर्थिक सहाय्य देण्यास व्यवस्थापन परिषदेत ठराव करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता याबाबत अटी, शर्तींची नियमावली तयार करण्यात आली आहे. आर्थिक सहाय्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर प्रशासन कक्षाकडे येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी नुकतेच जारी केले आहे.

कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयाचे कामकाज करताना व विद्यापीठाच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले असताना सेवकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याबरोबरच शासनमान्य पदावर कार्यरत असलेले सेवक व विद्यापीठ निधीतून नेमण्यात आलेल्या सेवकांच्या कुटुंबियांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आत्महत्या करणाऱ्या, अंमली अथवा मादक पदार्थ्यांच्या अतिसेवनांने मृत्यू झालेल्या तसेच गैरवर्तन केल्यामुळे अथवा गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्याचा लाभ मिळणार नाही. सेवकाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीलाच आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. सेवक कार्यरत असलेल्या कक्षाच्या विभागप्रमुखांच्या शिफारशीनुसारच प्रशासन कक्षाकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)