“त्या’ संस्था, शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा

वर्ग-2 च्या जमिनी देणार मालकी हक्‍काने


रेडी रेकनरच्या 50 ते 75 टक्‍के रक्‍कम जमा करावी लागणार

पुणे – राज्य शासनाने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांना दिलेल्या जमिनी त्याचबरोबर इनाम, वतन या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर वर्ग-2 (मालक सरकार) अशी नोंद असते. या जमिनींची मालकी सरकारची असते. आता या भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी संबंधीत संस्थेच्या अथवा शेतकऱ्यांच्या मालकी हक्‍काने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भोगवटार वर्ग-2 चे वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी रेडी रेकनरच्या 50 टक्‍के ते 75 टक्‍के रक्‍कम शासन दरबारी जमा करावी लागणार आहे. निर्णयामुळे संबंधितांना जमिनीचा मालकी हक्‍क मिळणार असून शासनाच्या तिजोरीत एकरकमी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी कारणांसाठी शासनाकडून विविध संस्थांना जमिनी अल्पदरात दिल्या जातात. 1966 पासून राज्य सरकारकडून अशा जागा देण्यात येत आहे. या जमिनी देताना सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद असते. सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-1 असा उल्लेख असतो. या जमिनींचे हस्तांतरण करताना प्रत्येकवेळी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. ही प्रक्रियेसाठी वेळ लागतो. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे.

एकरकमी महसूल होणार गोळा
पूर्वी शासनाकडे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. यांचे संरक्षण होण्यासाठी त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून शासनाने जमिनींचे वाटप केले. मात्र, सातबारा उताऱ्यावर वर्ग-2 (मालक सरकार) अशी नोंद घालण्यात येते. त्यामुळे या वर्ग दोनच्या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अधिमूल्य भरावे लागते. अशा जमिनींसाठी प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या अधिमुल्यातून राज्य शासनाला सर्व राज्यांतून दरवर्षी एक हजार कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यास परवानगी दिली तर शासनाला तोटा सहन करावा लागेल, असे सांगत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास नकार दर्शविला होता. मात्र, या जागा कायमस्वरुपी मालकी हक्‍काने दिल्या तर त्यातून शासनाला एकरकमी पैसे मिळतील. यातून मिळणारा महसूलही जास्त असेल. याबाबींचा विचार करून शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)