त्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद

चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे बदली करून घेतलेले शिक्षक आता रडारवर
विस्थापित शिक्षकांची मूळ जागी पुनर्पदस्थापना
नगर – जिल्हांतर्गत बदलीच्या प्रक्रियेत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे बदली करून घेतलेले शिक्षक आता रडारवर आले असून, अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करून खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून देणाऱ्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याबरोबर विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पुनर्पदस्थापना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्हांतर्गत बदलीसाठी विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णतः खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती देणे अपेक्षित होते. शिक्षकी पेशा हा उदात्त पेशा असल्यामुळे व भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने त्यांच्याकडून अर्ज भरताना बनावट प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर केली जाणार नाही, असे अपेक्षित असतानाही काही शिक्षकांनी संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेला आहे. त्याबाबत तक्रारी झाल्या आहेत. खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे.
या शिक्षकांच्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करावी. ही प्रक्रिया 10 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. या पडताळणीत दोषी आढळणाऱ्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, तसेच चुकीची बदली करून घेतलेल्या या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदस्थापना द्यावी व विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पुनर्पदस्थापना द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)