पिंपरी – महापालिकेत वैद्यकीय अधिकारी पदावर निवड केलेल्या तीन डॉक्टरांनी वेळोवेळी कळवूनही पूर्वचारित्र्य व वर्तणूक पडताळणी अहवाल सादर केला नाही. महापालिका नोकरीची आवश्यकता वाटत नसल्याने तीनही डॉक्टरांची निवड रद्द करण्यात आली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश जारी केला आहे. डॉ. योगेश्वर भावसार, डॉ. श्रीकांत चौधरी आणि डॉ. प्राजक्ता महाजन अशी निवड रद्द करण्यात आलेल्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. महापालिका आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पद सरळसेवा प्रवेशाने भरण्याबाबत निवड आणि प्रतिक्षा यादी तयार केली. त्यानुसार, या तीनही डॉक्टरांची निवड करण्यात आली. या निवडीच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या आदेशानुसार, नियुक्तीपूर्वी उमेदवारांची पूर्वचारित्र्य व वर्तणूक पडताळणी करणे आवश्यक असल्याने त्यांना महापालिका कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले. या डॉक्टरांनी संबंधित पोलीस कार्यालयास द्यावयाचे पत्र मिळण्याबाबत महापालिकेकडे विनंती अर्ज केला. त्यानुसार, महापालिकेने संबंधित पोलीस कार्यालयांना पत्र पाठवून पूर्वचारित्र्य व वर्तणूक पडताळणी अहवाल मिळण्याबाबत कळविले.
तथापि, त्या कार्यालयांकडून डॉक्टरांचे पूर्वचारित्र्य व वर्तणूक पडताळणी अहवाल प्राप्त झाले नाहीत. तीनही डॉक्टरांना वेळोवेळी कळवूनही त्यांनी पूर्वचारित्र्य व वर्तणूक पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे निवड करण्यात आलेल्या तीनही वैद्यकीय अधिकाऱ्यांना महापालिका नोकरीची आवश्यकता वाटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तीनही डॉक्टरांची निवड रद्द करण्यात आली आहे.
मुदतीत रूजू न झाल्याने कारवाई
डॉ. मनोज सुतार आणि डॉ. अवंतिका कयापाक या दोघांचीही महापालिकेत वैद्यकीय अधिकारी पदावर सरळसेवा प्रवेशाने निवड करण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत दोन्ही वैद्यकीय अधिकारी रूजू झाले नाहीत. त्यांना महापालिका नोकरीची आवश्यकता वाटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही डॉक्टरांची नियुक्ती रद्द करण्याची कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा