“त्या’ विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशअर्ज भरावे लागणार

मुक्त विद्यालय मंडळातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज भरून 5 फेब्रुवारीपर्यंत ते संपर्क केंद्रावर जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य मुक्त विद्यालय मंडळातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 18 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज शुल्क व कागदपत्रासह संपर्क केंद्रांच्या शाळामध्ये जमा करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर संपर्क केंद्रांच्या शाळांनी अर्ज, शुल्क व कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार व निवडलेल्या माध्यमानुसार संपर्क केंद्राची निवड करता येणार आहे. केंद्रांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापन व मुल्यमापन विषयक सर्व कामकाज करावयाचे आहे. विभागीय मंडळाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर खासगी विद्यार्थी योजनेच्या प्रचलित पद्धतीने अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर अर्जावर पात्र अथवा अपात्र असा शेरा देऊन लिपिक, शाखाप्रमुख, शाखाधिकारी, सहायक सचिव, सहसचिव व विभागीय सचिव यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहे.

पात्र अथवा अपात्र विद्यार्थ्यांची निश्‍चिती झाल्यानंतर नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन तयार होणार असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. छाननीनंतर विद्यार्थ्यांना त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्यात येणार आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांची अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांतील सर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी नावनोंदणीचे वेळापत्रक व नियमावली विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)