‘त्या’ वक्तव्याप्रकरणी नाशिक पालिकेच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नाशिक महापालिकेच्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करुन, संबंधित प्रकरणाची चौकशी केली होती.

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी आढळल्याने, आता समिती भिडेंविरोधात न्यायालयात जाऊन आपला अहवाल सादर करेल. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत असलेल्या कलम-22 चा भिडेंनी भंग केल्याचा दावा या समितीने केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,” असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)