“त्या’ रुग्णांसाठी “बॅरिऍट्रिक’ शस्त्रक्रिया उपयुक्‍त

डॉ. नीरज रायते : “वजन घटविण्याचे शास्त्र’वर चर्चासत्र

पिंपरी – ज्यांचा बीएमआय इंडेक्‍स 40 पेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांसाठी बॅरिऍट्रिक शस्त्रक्रिया आवश्‍यक आहे, असे मत बॅरिऍट्रिक सर्जन डॉ. नीरज रायते यांनी व्यक्‍त केले.

पुणे येथील डायबेटिस अँड ओबेसिटी सपोर्ट सोल्युशन्स (डॉस) संस्थेच्या वतीने फॅमिली फिजीशियन यांच्यासाठी चिंचवड येथे वजन घटविण्याचे शास्त्र या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. प्रवीणा चक्के. यावेळी डावीकडून डॉ. महेश मारणे, डॉ. खेमचंद सारडे, डॉ. संतोष पडवळ, डॉ, सुधीर घाटगे, डॉ, नीरज रायते, डॉ, सतीश पट्टणशेट्टी उपस्थित होते.

डॉ. नीरज रायते यांनी बॅरिएट्रिक सर्जरीविषयी खूपचे मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या तरुण मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या वजनामुळे सुमारे 28 वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या स्थूलपणा अगदी सहजगत्या येतो. ज्यांना औषधोपचारांचा उपयोग होत नाही, अशा रुग्णांसाठी शस्त्रक्रिया आवश्‍यक असते. त्यातही शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची करायला हवी हे देखील खूप महत्वाचे आहे. कारण, या शस्त्रक्रियांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत.

रुग्णासाठी कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रियेची निवड करायची हे देखील या उपचार पद्धतीत आवश्‍यक असते. तसेच, शस्त्रक्रियेनंतर योग्य आहार आणि व्यायामदेखील आवश्‍यक असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये फॅमिली फिजिशियनचा वाटा खूप मोलाचा असतो. कारण त्यांचा रुग्णांशी वारंवार संपर्क असतो. तसेच 100 पैकी 70 रुग्णांना शस्त्रक्रियेच आवश्‍यकता नसते. त्यांचे योग्य समुपदेशन केले तरी चालते. प्रत्येक व्यक्तीचे वजन वाढण्याचे कारणे ही वेगवेगळी असतात. त्यामुळे वजन घटवण्याचे शास्त्र काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे असते. नंतरच्या सत्रात मोहन नायर यांनी डॉस संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

यावेळी डॉ. मल्हार गानला यांनी स्थूलपणा आटोक्‍यात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम आवश्‍यक असतो याची शास्त्रशुद्ध माहिती दिली. डॉ. कुंदन खर्डे यांनी स्थूलपणा म्हणजे काय याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर आहार तज्ज्ञ मीना आचरेकर यांनी योग्य आहार कसा घ्यावा, वजन आटोक्‍यात ठेवण्यासाठी आहार पद्धती कशी असावी, किती प्रमाणात आहार घ्यावा याचे विस्तृत विवेचन केले. मानसोपचार सल्लागार केहाली शिंदे यांनी स्थूलपणा घटवण्यासाठी रुग्णांचे मानसिक प्रबोधन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)