“त्या’ महिलेने केला बलात्काराचा बनाव

लोणी काळभोर-उरुळी कांचन- जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट असून नारायण गव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) परिसरातील दोघांनी पूर्ववैमनस्यातून आपल्या शत्रूंना तुरुंगात पाठविण्यासाठी महिला व इतरांना हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी आज सायंकाळी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.
याबाबतचे सविस्त वृत्त असे की, वैयक्तिक भांडणातून दोन तरुणांवर बलात्काराचा खोटा आरोप करून, त्यांना तुरुंगात पाठविण्याचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला. या तपास कामाबद्दल ग्रामीण पोलीस कौतुकास पात्र आहेत. उरुळी कांचन- जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे देवदर्शन करून परत घरी जाताना हा प्रकार शिंदवणे घाटात घडला, अशी तक्रार संबंधित महिलेने केली होती. नारायणगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) परिसरातील दोघांनी पूर्ववैमनस्यातून आपल्याच गावातील दोन तरुणांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव (ता. दौड) परिसरातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. फॉर्च्युनर मोटारीतून आलेल्या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुणही संबंधितांनी पैसे देऊन उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही खोटी तक्रार देण्यासाठी संबंधित महिलेने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. शेवटी हा व्यवहार दिड लाख रुपयांत ठरला होता. त्यातील दहा हजार रुपये तिला अगोदरच देण्यात आले होते. उर्वरित रक्कम तक्रार दाखल केल्यानंतर देण्यात येणार होते. साक्षीदार म्हणून उभे करण्यात आलेल्या दोघा तरुणांनाही पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. संबंधित महिलेनेही दोघांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली आहे.
संबंधित महिलेच्या तक्रारीतील दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते दोघे व फॉर्च्युनर मोटार घटना घडलेल्या दिवशी नारायणगव्हाण परिसरातच असल्याचे निष्पन्न झाले. त्या तरुणांनी त्यांना एका व्यक्तीने पूर्ववैमनस्यातून तुरुंगात खडी फोडण्यात पाठवण्याची धमकी दिली होती. या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता, महिलेने दिलेली तक्रार बनावट असल्याचे जाणवले आणि वरील कट उघड झाला. संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती संदीप पखाले यांनी दिली.

  • 48 तासांत “कट कारस्थान’ उघड
    देवदर्शन घेऊन नारायणपूरहून परतत असताना, मोटारीमधून आलेल्या दोघांनी घाटात बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. त्या दोघांना तसेच त्यांच्या गाडीचा नंबर पाहिले असल्याचे सांगत दोन साक्षीदारही तिने उभे केले होते. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लोणी काळभोर पोलिसांनी वेगवेगळी पथके बनवून, तपासाला गती दिली. मात्र महिलेच्या तक्रारीत त्रुटी असल्याने, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व स्थानिक पोलिसांच्या सलग 48 तासांच्या तपासानंतर हा कट या तरुणांना तुरुंगात पाठविण्यासाठी रचल्याचे निष्पन्न झाले.
  • आदल्या दिवशी केली रेकी
    या दोन गटातील तरुणांचा काही वर्षांपासून वाद आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी त्या दोघांना लवकरच खडी फोडायला पाठवणार असल्याची धमकीही दिली होती. कट रचणाऱ्यांनी संबंधित महिलेला व बनावट साक्षीदार तरुणांना मोटारीतून शिंदवणे घाटात फिरवून आदल्या दिवशी प्रात्यक्षिक (रेकी) करून घेतले होते. विश्रांतवाडी- येरवडा परिसरातून दोन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून, कटात सहभागी करून घेतले. हा कट अंमलात आणण्यासाठी जवळजवळ महिनाभर आधी पासून तयारी सुरू होती. या कटात एका महिलेसह एकूण सात जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)