“त्या’ महिला अधिकाऱ्याला भरसभेत समज

फ्लेक्‍सवरील तक्रारदाराचे नाव केले उघड : स्थायी समितीत प्रशासन धारेवर

पिंपरी –अनधिकृत फ्लेक्‍सबाबत तक्रार करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव उघड करणे एका महिला अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. स्थायी समितीच्या आदेशानंतर अखेर या महिला अधिकाऱ्याला आयुक्‍तांनी भर सभेत समज दिली.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) सभापती सिमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेमध्ये स्थायी समिती सदस्या तथा महिला व बालकल्याण समिती सभापती असलेल्या उषा मुंढे यांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सबाजीकडे लक्ष वेधले. त्यांच्या पिंपळे गुरव प्रभागातील पदपथावर असलेल्या एका संघटनेच्या अनधिकृत फ्लेक्‍सबाबत त्यांनी प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांच्याकडे तक्रार केली होती. झगडे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत त्यावर कारवाई देखील केली. मात्र, कारवाईबाबत संबंधित संघटनेचे पदाधिकारी झगडे यांच्याकडे जाब विचारायला आल्यानंतर त्यांनी मुंढे यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचे कार्यालय गाठून गोंधळ घातल्याची व्यथा मुंढे यांनी भर स्थायी समिती सभेत मांडली.

अनधिकृत फ्लेक्‍सबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवणे प्रशासनाला बंधनकारक असताना अधिकारी नगरसेवकांचे नाव तक्रारदारांसमोर उघड करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल मुंढे यांनी केला. फ्लेक्‍सवर कारवाई करणाऱ्या नगरसेवकांची नावे सांगून प्रशासन पिसाळलेली कुत्री अंगावर सोडत आहे, असा त्रागा मुंढे यांनी व्यक्त केला. आम्ही जी कामे सांगतो ती अधिकारी करत नाहीत, नको तो उपद्‌व्याप करतात. अशा परिस्थितीत आम्ही कामे कशी करायची, असा सवाल करत त्यांनी आमचा राजीनामा घ्या, अधिकाऱ्यांनाच प्रभाग चालवू द्या, अशी मागणी केली.

यावर स्मिता झगडे यांनी खुलासा करताना संबंधित संघटनेचे पदाधिकारी प्रभाग कार्यालयात दोन-तीन तास ठिय्या मांडून होते. त्यांच्याकडून फ्लेक्‍सवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याची भिती होती. त्यामुळे आपण मुंढे यांचे तोंडी नाव सांगितले. मात्र, लेखी स्वरुपात कोणतेही उत्तर दिले नाही, असा खुलासा केला. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना नगरसेवकांना तक्रार करायची वेळ का येते, असा सवाल करत आशा शेंडगे यांनी प्रशासनाची कोंडी केली. झगडे या शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी आहेत. त्या तीन वर्ष झाल्यानंतर निघून जातील, मात्र, नागरिकांशी आम्हाला सामना करायचा आहे, असा संताप शेंडगे यांनी व्यक्त केला. स्थायी सभापती सावळे यांनीही यावर नाराजी व्यक्त करत आयुक्त हर्डीकर यांना कारवाईचे आदेश दिले.

आयुक्‍तांनी टोचले प्रशासनाचे कान
अनधिकृत फ्लेक्‍सबाबत माहिती देणाऱ्या तक्रारदाराचे नाव जाहीर करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा सवाल करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झगडे यांना भर सभेत समज दिली. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे. फ्लेक्‍स काढला म्हणून कोणी धमकावत असेल तर आयुक्त म्हणून थेट आपल्याशी संपर्क साधावा, सदस्यांना विश्‍वात घ्यावे. भविष्यात असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी लागेल. आपण ड्युटी बाऊंड आहोत याचे भान अधिकाऱ्यांनी राखावे, अशा शब्दात आयुक्‍त हर्डीकर यांनी प्रशासनाचे कान टोचले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)