“त्या’ महिलांना महापालिका देणार वैद्यकीय प्रमाणपत्र

File Photo

चारचाकी वाहन प्रशिक्षण : “आरटीओ’च्या परीक्षेसाठीही मार्गदर्शन

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिलांना चारचाकी हलके वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या महिलांना आता महापालिकेच्या रुग्णालयांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार असून आरटीओच्या ऑनलाईन परीक्षेबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना चारचाकी हलके वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. वाहन परवाना काढण्यापूर्वी अर्जदाराला आपल्या तंदुरुस्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. महापालिकेकडून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना हे वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी रुग्णालयांमध्ये फिरण्याची वेळ येवू नये यासाठी महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही शूल्क महिलांना भरावे लागणार नाही.

वाहन परवान्यासाठी आरटीओकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच ऑनलाईन परीक्षा देखील द्यावी लागते. ऑनलाईन परीक्षेबाबतची माहिती नसल्याने महिला परवाना परीक्षेत अपात्र ठरतात. पात्र ठरण्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी महापालिका मोरवाडी आयटीआय येथे महिलांना आरटीओच्या ऑनलाईन परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करणार आहे. वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अर्जदार महिलांनी या दोन्ही सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागर वस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

दलालांकडून होणारी फसवणूक टळणार
आरटीओच्या नियमानुसार, शिकाऊ परवाना, परवाना नूतनीकरण अशा कोणत्याही अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र असणे ही आवश्‍यक बाब आहे. मात्र, या प्रमाणपत्रासाठी आरटीओ परिसरातील दलालांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. कोणत्याही डॉक्‍टरच्या प्राथमिक तपासणीविनाच एजंटाकडून मनमानीपध्दतीने बेकायदा शूल्क आकारुन वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. आरटीओकडील छापील अर्जावर कोणत्या तरी मेडिकल प्रॅक्‍टिशनर डॉक्‍टरचा शिक्का व स्वाक्षरी असते. परवाना काढणारे नवोदित झटक्‍यात मिळणाऱ्या या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दलालांची मदत घेतात. मात्र, महापालिकाच हे प्रमाणपत्र महिलांना मोफत उपलब्ध करुन देणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)