‘त्या’ बॅंकांचा महापालिकेला ठेंगा

11 गावांच्या बॅंक खात्यामधील निधी देण्यास नकार


पालिकेने पाठविली 100 पेक्षा अधिक पत्रे 

पुणे- समाविष्ट 11 गावांच्या आर्थिक स्थितीची घडी महापालिका प्रशासनास अजूनही बसविता आलेली नाही. या गावांचे खाते असलेल्या बॅंकांनी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. या बॅंकांकडे जमा असलेल्या 10 कोटी रुपयांमधील 3 हजार रुपये पालिकेला वर्ग केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बॅंकांना तब्बल 103 पेक्षा अधिक पत्र पाठविल्यानंतरदेखील ही रक्कम मिळाली नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाने बुधवारी मुख्यसभेत केला. आयुक्तांनी तातडीने या बॅंकांची बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

आंबेगाव खुर्द गावाचे 3 लाखांचे पाणी वीज बिल थकल्याचे सांगत ही थकबाकी का भरली जात नाही, असा सवाल बुधवारी झालेल्या मुख्यसभेत उपस्थित झाला. तसेच या गावाचे 56 लाख रुपये बॅंकेत असतानाही ती का भरली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी या गावाची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले. त्यानंतर या गावाच्या खर्चाबाबत मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी खुलासा केला. या गावाची सुमारे 10 कोटींची रक्कम बॅंकेत जमा आहे.

मात्र, त्यातील 3 हजार रुपये जमा झाले. मात्र, हे अजूनही पालिकेला मिळालेले नाहीत. हे पैसे असलेल्या बॅंकांना पत्र पाठविली आहेत. मात्र, प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे या गावांसाठी निधी नसल्याचे कळसकर यांनी सांगितले. तर या गावांचे थकबाकीचे बील तातडीने भरण्यात येणार असून कोणत्याही गावचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

अशी आहे गावांची आर्थिक सद्यस्थिती
आर्थिक बाबींच्या दप्तरानुसार, या गावांना 1 एप्रिल 2017 पासून सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकारे 56 कोटी 86 लाख, 51 हजार 668 रुपयांचा महसूल मिळालेला आहे. त्यातील तब्बल 46 कोटी 19 लाख 37 हजार 747 रूपयांचा निधी खर्ची पडला आहे. त्यामुळे या गावांकडे अवघे 10 कोटी 67 लाख 13 हजार 920 रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम तसेच गावांची बॅंक खाती अजूनही पालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत. तर या गावांमधून जमा होणारा महसूल महापालिकेकडून अजूनही त्याच गावांच्या बॅंक खात्यात जमा केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)