“त्या’ पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्येशी संबंध नाही

वकील धर्मराज चंडेल : आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांच्या वाढीला विरोध

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरे याचा मेहुणा शुभम, अजिंक्‍य सुरळे आणि त्यांचा मित्र रोहित रेगे यांच्याकडून सीबीआयने ऑगस्ट 2018मध्ये औरंगाबाद येथून एक पिस्तूल जप्त केले होते. सदर पिस्तूल हे सीबीआयतर्फे गुजरात येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून, अहवाल नकारात्मक आहे. या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्या नसल्याचा अहवाल गुजराथ फॉरेन्सिक लॅबने दिला असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी न्यायालयाला दिली. तसेच आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांची वाढ करण्यास विरोध केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांच्या न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी झाली.

-Ads-

यावेळी अॅड. धर्मराज न्यायालयात युक्तीवाद करत होते. ते म्हणाले की, सीबीआय केवळ काय तपास केला हे सांगते. मात्र, पिस्तुलच्या तपासात काय निष्पन्न झाले हे सांगत नाही. या न्यायालयास 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार नसल्याचे बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दाखला देत सांगितले. जर दोषारोपपत्र दाखल करण्यास वाढ हवी असेल तर, तपास पूर्ण का झाला नाही, सरकारी वकीलांचा अहवाल तसेच केसमधील महत्वाच्या मुद्यांवर काय तपास झाला, अजून कोणत्या मुद्यावर तपास करावयाचा आहे, आरोपीला जेलमध्ये का ठेवयाचे आहे, या सर्व गोष्टी सीबीआयने स्पष्ट करणे गरजेचे होते. परंतु, सीबीआयने सादर केलेला अहवालातून ठोस काही निष्पन्न होत नाही.

मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल यातून सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे अद्याप सीबीआयने स्पष्ट केले नाही. तपासात सीबीआयने नेमकी काय प्रगती केली हे सांगितले नाही. त्यांनी विरेंद्र तावडेवर जे आरोपपत्र दाखल झाले. त्याच आरोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून 90 दिवसांची वाढ मागितली आहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली.

न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकला असून त्यावरील निर्णय शनिवारपर्यंत राखून ठेवला आहे. दरम्यान, सचिन अंदुरेच्या अटकेला 90 दिवसपूर्ण होत असून बचाव पक्षाच्या वतीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सचिन अंदुरेला न्यायालयात हजर करणणत आले होते. त्यावेळी त्याची पत्नी, मुलगीही न्यायालयात हजर होती.

दरम्यान, अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तुलाचा दाभोलकर हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा आम्ही कधी केलेला नाही. अमोल काळे याला गौरी लंकेश खून प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची डॉ. दाभोलकर प्रकरणात ही भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सीबीआयचे सरकारी वकील बी. राजू यांनी न्यायालयाला सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)