“त्या’ पिता-पुत्राला 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महिलेचा खून करून पोलीस निरीक्षकावर केला होता गोळीबार

पुणे – वडगावशेरी भागात राहणाऱ्या महिलेचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षकार गोळीबार करून त्याना गंभीर जखमी करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी जेरबंद केले. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला आहे.

शिवलाल ऊर्फ शिवाजी बाबुलाल राव (वय-39) आणि त्याचा मुलगा मुकेश ऊर्फ मॉंटी शिवलाल ऊर्फ शिवाजी राव (वय-19, दोघेही रा. नवी दिल्ली, मूळ रा. जितरन, जिल्हा पाली, राजस्थान) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी हे सुपारी घेऊन खूनाचे गुन्हे करीत असल्याचे चौकशीत निष्णन्न झाले आहे. मात्र, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीमध्ये राहत असलेल्या एकता ब्रिजेश भाटी यांचा बुधवारी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी राहत्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ते पळून जाण्याची शक्‍यता असल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपींचा शोध सुरू केला ते पुणे स्टेशनवरून झेलम एक्‍स्प्रेसने दिल्ली येथे पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी 3 पथक तयार केली होती. पोलीस निरीक्षक गजानन पवार हे त्यांच्या पथकासह फ्लॅटफार्म नंबर तीनवर थांबले होते.

पोलीस कर्मचाऱ्याने दोन्ही आरोपी समोरून येत असल्याचे पवार यांना सांगून त्या दिशेने इशारा केला त्यांनी तातडीने दोघांना पकडून बाजूला घेतले. त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी शिवलाल राव याने आपल्याकडील पिस्तुल काढून त्यांच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पवार यांच्या जबड्याला लागली, तर दुसरी त्यांच्या फुफ्फुसाला लागली. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या दिशेने पळाले पाठलाग करून दोघांनाही पोलिसांनी पकडले.

दोघांनाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कोठून आणले, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल कोठून आणली, हा गुन्हा कोणत्या कारणांसाठी केला. कोणाच्या सांगण्यावरून खून केला आदी तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रेमसंबंधातून गोळीबार झाल्याचा संशय
मयत महिलेचा पती ब्रिजेश भाटीच्या विरोधात दिल्ली येथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यास 28 मे 2017 रोजी अटक केली होती. तसेच तो दीड महिना तिहार जेलमध्ये होता. त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर तो परिवारासह पुणे शहरात स्थलांतरित झाला होता. भाटी याचे दिल्लीतील एका 37 वर्षिय महिलेसोबत मागील चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. गतवर्षी फेब्रुवारी 2017 मध्ये ती महिला भाटीला भेटायला पुणे येथे आली होती. त्यानंतर त्या महिलेने बलात्कार केल्याप्रकरणी मे 2017 मध्ये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रेमसंबंधातून गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)