“त्या’ नविन नियमाचा फूल बाजाराला फटका

दुपारी दीडपर्यंतच विक्रीसाठी वेळ : मोगरा, जुई उत्पादक शेतकरी अडचणीत

पुणे – फूल बाजार दुपारी दीड पर्यंत सुरू ठेवण्याच्या बाजार समितीच्या नवीन नियमामुळे जिल्ह्यातील मोगरा आणि जुई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुणे-नगर महार्गावरील दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शेतकऱ्यांना बाजारात पोहोचण्यास उशीर होत असल्याने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. याप्रकरणी प्रशासनाने फुलबाजारात मोगरा, जुई फुलांच्या विक्रीस दुपारी तीन वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मोगरा व जुई फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत सचिवांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात उन्हाचा कडाका वाढल्यानंतर दरवर्षी बाजारात मोगरा, जुई आदी फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. सध्यस्थितीत जिल्ह्यातील कुंजीरवाडी, सोरतापवाडी, तळेगाव, उरळी कांचन, नायगाव येथून मोठ्या प्रमाणात मोगरा बाजारात दाखल होत आहे. त्याला पुण्यासह कल्याण, पनवेल, ठाणे, खोपोली, खिंड आदी मुंबईच्या उपनगरांमधून मागणी होत आहे. लग्नसराई, यात्रा-जत्रांमुळे मोगऱ्याला मागणी नेहमीच अधिक राहाते. मात्र, गुरुवारपासून फुलबाजारासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. ती तळेगाव ढमढेरे परिसरातील फूल उत्पादकांना गैरसोयीची ठरत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोगरा या फुलाची तोडणी करून नव्या वेळेनुसार फुलबाजारापर्यंत आणणे शक्‍य होत नाही. त्याबरोबरच तोडणीअभावी मालाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी, मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विक्रीसाठी आणखी दोन तास वाढवून द्यावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

मार्केटयार्डातील कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास अडचण होत होती. या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने फूल बाजारासंदर्भात हा आदेश जारी करण्यात आला असल्याचे सांगत शेतकरी एकनाथ धायरकर म्हणाले, नियमावलीतील बाजाराची वेळ अडचणीची ठरत असल्याने शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे परिसरातील 25 शेतकऱ्यांच्यावतीने सचिवांना निवेदन देण्यात येणार आहे. गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजार हा तळेगाव ढमढेरेपासून जवळपास 65 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी लवकर उठून मोगऱ्याची तोडणी करून तो बाजारात विक्रीसाठी आणण्यात येतो. मात्र, बाजारात आणतेवेळी पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगांव, वाघोली, चंदननगर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी, बाजारात पोहोचण्यास दररोज दोन ते अडीच तासांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची भावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)