“त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

पिंपरी – निविदा प्रक्रियेतील तफावतीमुळे कचरा संकलनात 84 कोटी 51 लाख रुपयांचा झोलझाल करण्याचा डाव उघडकीस आला असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना, “”मी कोणाला पैसे कमावून दिले याचा पुरावा द्या”, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देत दत्ता साने यांनी “”आयुक्त साहेब हा घ्या पुरावा”, असे म्हणत घऱोघरी जाऊन कचरा संकलन करणारे कंत्राटदार व सत्ताधारी यांच्यातील संगनमताने होणाऱ्या अपहाराकडे लक्ष वेधले आहे. साने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे कचरा संकलनात 84 कोटी 51 लाख रुपयांचा अपहार होत असून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व तो मोशी कचरा डेपो येथे जाऊन तो डंपींग करणे यासाठी शहराच्या एका भागासाठी बी. व्ही.जी. व दुसऱ्या भागासाठी ए. जी. इनव्हायरो इंफ्रा या कंपन्यांना ठेका देण्यात येणार होता. मात्र या दोन्ही कंत्राटदारांनी पदाधिकारांशी संगनमत करत स्वतःच्या सोयीने अटी व शर्तींचा निविदेमध्ये समावेश केला.

याविरोधात विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर आयुक्तांनी कोणतेही सबळ कारण न देता ही निविदा प्रक्रिया रद्द केली. संबंधित ठेकेदारांनी दर कमी केल्याचे पत्र दिल्यानंतर पुन्हा स्थायी समितीमध्ये सुधारीत दराला मंजुरी देण्यात आली. त्याचा आधार घेत आता महापालिकेकडून 84 कोटी 51 लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा केला जात आहे. हा अपहाराचा ढळढळीत पुरावा असून आयुक्‍तांनी संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, असे साने यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)