संग्रहित छायाचित्र

वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांचे आदेश : आता टोईंग केलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र्य नोंदवही

पुणे – नो पार्किंगमधील वाहने उचलताना त्यामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी टोईंग वाहनांना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, फरासखाना हद्दीत टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही झाकून सर्रासपणे वाहने उचलण्याची कारवाई सुरू असल्याचे वृत्त दै. प्रभात ने बुधवारी प्रसिध्द केले होते. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी याची दखल घेत पारदर्शकतेला हारताळ फासणाऱ्या टोईंग टेम्पोवर कारवाई केली असून संबंधीत टेम्पोचे काम एका महिन्यासाठी थांबवण्यात आले आहे. तसेच यापुढे कारवाई करताना टोईंग गाडीमध्ये स्वतंत्र्य नोंदवही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनेकदा “नो पार्किंग’मधील वाहने उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. काहीवेळा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता यावी आणि गाडी उचलण्याच्या घटनेचे चित्रीकरण व्हावे, यासाठी शहरातील सर्व टोईंग टेम्पोंना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी अप्पा बळवंत चौक येथे सीसीटीव्ही झाकून कारवाई सुरु असल्याचे वृत्त दै. प्रभातने दिले होते. तसेच यावेळी एका महिलेची पार्किंग झोनमधील गाडी टोईंग केल्याची घटनाही उघडकीस आणली होती. यामुळे याची गंभीर दखल वाहतूक उपायुक्तांनी घेत शहरातील सर्वच टोईंग वाहनमालकांना काही सूचना केल्या आहेत.

यामध्ये टोईंग वाहनांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र्य रजिस्टर ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सदर रजिस्टर वेळोवेळी चेक करणे, प्रभारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ज्या भागात कारवाईची गरज आहे त्याच ठिकाणी कारवाई करणे, टेम्पो तसेच क्रेनवर ऑपरेटर कर्तव्यासाठी पोलीस नाईक व त्यावरील दर्जाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक करणे, टोईंग वाहनावर कामावर असलेला कुठलाही खाजगी कर्मचारी वाहन चालकाशी बोलणार नाही. तसेच याची खबरदारी संबंधीत पोलीस कर्मचारी घेतील, टेम्पो कारवाईसाठी जाण्याआधी सीसीटीव्ही चालू आहे की, नाही याची खात्री करण्याचे काम प्रभारी अधिकारी करतील, टेम्पो तसेच क्रेन आपल्या हद्दीतच काम करतील, नियंत्रण कक्षाच्या आदेशाशिवाय हद्दीबाहेर काम करताना आढळून आल्यास टेम्पोवर नेमलेल्या संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, टेम्पोतून आणलेल्या वाहनांची नोंद करून, टोईंग पावती झाल्याची खात्री प्रभारी अधिकारी करतील, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले असून यामुळे खासगी कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे पारदर्शकता वाढून सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे.

टोईंग वाहनांवरील खासगी कर्मचाऱ्याला वाहनचालकाशी बोलण्याचा, त्यांची कागदपत्रे विचारण्याचा अधिकार नाही. हे काम टोईंग गाडीवर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांचे आहे. टोईंग वाहनावरील सीसीटीव्ही चालू असल्याची खात्री करूनच ते सोडण्यात येईल, तसेच माहितीसाठी रजिस्टरवर नोंद करण्याचेही सांगण्यात आले आहे.
– तेजस्वी सातपुते, वाहतूक उपायुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)