त्या चारचाकी वाहनांनी वाढतेय डोकेदुखी..!

– सम्राट गायकवाड
सातारा शहरातील लोकसंख्येसह आता वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत असताना रस्त्यांची संख्या व रूंदी मात्र अद्याप आहे तशीच आहे. ग्रेड सेप्रेटरच्या निमित्ताने भविष्यात पोवई नाक्‍यावरील वाहतूक सुरळीत होणार असली तरी सद्यस्थितीत शहरातील सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी होण्यामागे रस्त्यांची संख्या व रूंदी ही कारणे असली तरी अतिक्रमणे हे देखील मुळ दुखणे आहे. अतिक्रमणांचा ज्या ज्या वेळी विषय समोर येतो तेंव्हा हॉकर्सवर कारवाई केली जाते. मात्र, शहरात अनेक ठिकाणी बिल्डर व व्यापाऱ्यांनी इमारती उभारल्या आहेत त्यापैकी बहुतांश इमारतींमध्ये गिऱ्हाईकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली नाही. परिणामी गिऱ्हाईकांची वाहने रस्त्यावर लागलेली दिसून येतात व त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीत भर पडत आहे. हे शहरातील वाहतूक कोंडींचे प्रमुख कारण आहे. मात्र, त्याबाबत ना पालिकेकडून, ना वाहतूक पोलिसांकडून त्या इमारतींवर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही.
वाहतूक कोंडीचे हे दुखणे असताना दुसऱ्या बाजूला नव्याने एक समस्या निर्माण होत आहे. ती म्हणजे रस्त्यांवर चार चाकी वाहनांची वाढती संख्या. रस्त्यांची रूंदी अगोदरच कमी आणि त्यात चार चाकी वाहनांच्या वाढत्या संख्यने पादचारी व दुचाकीचालकांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामध्ये केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी एका व्यक्तीसाठी रस्त्यावर चारचाकी वाहन आणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यास लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. शहरातील सर्व रस्त्यांवर जेव्हा इनोव्हा व फॉरच्युनर यासारख्या अधिक रूंदी असणारी वाहने चालविली जातात तेव्हा ती आपसुकच रस्त्याचा 70 टक्के भाग व्यापतात. परिणामी पादचारी व लहान वाहनधारकांची डोकदुखी वाढते. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी एका व्यक्तीसाठी एवढी मोठी वाहने आणण्याची खरच आवश्‍यकता आहे का, यावर विचारमंथन होण्याची खऱ्या अर्थाने आवश्‍यकता आहे. केवळ आणि केवळ प्रतिष्ठेसाठीच 20 लाखापासून कोट्यावधी रूपयांपर्यत गुंतवणूक करायची व ऍव्हरेज कमी असताना डिझेलवर खर्च करून रस्त्यावरील पादचारी व दुचाकीचालकांची डोकेदुखी का वाढवायची, याचा विचार आता त्या चारचाकी चालकांनी करणे गरजेचे आहे. कालपर्यंत कोणतेही चारचाकी वाहनाचा वापर हा परगावी जाण्यासाठी केला जायचा मात्र आता शहरात व आता ग्रामीण भागात ही केवळ चार-दोन किलोमीटर अंतरासाठी देखील भले मोठे वाहन रस्त्यावर आणण्याचे फॅड वाढले आहे. ह्यातून कोठे तरी सावरण्याची आवश्‍यकता आहे तसेच खरेच एवढे मोठे वाहन रस्त्यावर आणण्याची आवश्‍यकता आहे का याबाबत विविध मार्गांनी प्रबोधन होण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सरकारचा परिवहन विभाग व वाहतूक पोलीसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषत: परिवहन अधिकाऱ्यांनी प्रबोधनासाठी पाऊल उचलायला हवे. कारण वाहन खरेदी केल्यानंतर परिवहन विभागाकडे नोंदणी करणे हा पहिला टप्पा असतो. नोंदणी करतानाच अरूंद रस्त्यांवर वाहने आणणे आवश्‍यक आहे का, याबाबतचे सविस्तर प्रबोधन परिवहन अधिकाऱ्यांनी केल्यास खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)