“त्या’ गावांना लवकरच “खडकवासला’चे पाणी

कालव्याच्या 36 क्रमांकाच्या पोटचारीचे काम प्रगतीपथावर

जळोची – पारवडी (ता. बारामती) येथून खडकवासला कालव्यातून सिद्धेश्‍वर निंबोडी, मदनवाडी (ता.इंदापूर) कडे जाणाऱ्या 36 क्रमांकाच्या पोटचारीच्या तिसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आले आहे. या चारीच्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण व चौथ्या टप्प्याच्या दुरुस्तीचे काम काही अपवाद वगळता पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम बाकी आहे ते लवकर सुरु झाल्यास या माध्यमातून आगामी काळामध्ये या भागातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या हक्काच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे पारवडी, सिद्धेश्‍वर निंबोडी तसेच मदनवाडीच्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.

पारवडी येथून सिद्धेश्‍वर निंबोडी, मदनवाडी या भागाला खडकवासला प्रकल्प नवीन मुठा उजवा कालवा वितरिका क्र.36 च्या 1 ते 19 किमी अंतराच्या या वितरीकेच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी 1983 मध्ये सुरु झालेले काम 1993-94 मध्ये पूर्ण झाले. मात्र, सिद्धेश्‍वर निंबोडी पर्यंतचा काही भाग वगळता तेथुन पुढे मदनवाडी पर्यंत पाणी कधी पोहोतच नव्हते. या पार्श्‍वभूमीवर या भागातील ग्रामस्थांची वितरीका दुरुस्तीच्या मागणी होत होती. यावर जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार टप्प्यात चार कोटी 38 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

पहिल्यांदा चौथ्या टप्प्याच्या 16 ते 19 किलोमीटर अंतराच्या 75 लाख रुपये खर्चाचे काम काही अपवाद वगळता तर पहिल्या टप्प्यातील 1 ते 5 किलोमीटरचेही काम पूर्ण करण्यात आले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील 11 ते 16 किलोमीटर अंतराच्या पोटचारी दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. आता फक्त दुसऱ्या म्हणजेच 6 ते 11 किलोमीटर या टप्प्याच्या काम बाकी आहे. याबाबत तात्काळ कार्यवाहीची गरज व्यक्‍त होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्कातून या पोटचाऱ्या खोदण्यात आल्या त्यांना अद्याप पर्यत एक रुपयाचाही मोबदला मिळाला नसल्याने याबाबतही प्रशासनाकडून कार्यवाहीची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सिद्धेश्‍वर निंबोडीचे सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत, धनंजय धुमाळ, शंकर कन्हेरकर, संतोष नगरे, संपत सवाणे, रमेश कन्हेरकर, राजेंद्र सवाणे यांनी उर्वरित पोटचारीची तात्काळ दुरुस्ती करुन या चारीच्या माध्यमातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)