‘त्या’ कालवाग्रस्तांचे संसार पालिका उभारणार

ताट-वाट्यांसह इतर साहित्य 31 ऑक्‍टोबरपूर्वी देणार

पुणे – जनता वसाहत परिसरात खडकवासला कालवा फुटल्याने 806 संसार वाहून गेले आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी महापालिकेकडून संसारपयोगी साहित्य दिले जाणार आहे. त्यात ताट, वाट्या, तांबे आणि चमचापासून प्रत्येक घरासाठी चार अंथरून आणि चार पांघरून दिली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालवाग्रस्तांना दि.31 ऑक्‍टोबरपूर्वी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार असून पुढील तीन दिवसांत त्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मध्यवर्ती भांडार विभागास दिले आहेत. प्रत्येकी 11 हजार रुपयांचे हे साहित्य असून 806 बाधितांना ते दिले जाणार आहे.

दि.27 सप्टेंबर रोजी खडकवासला मुठा (उजवा) कालवा जनता वसाहतीजवळ फुटला. या दुर्घटनेत दांडेकर पूल वसाहतीतील स. नं. 130, 134 आणि 124 मधील 806 घरांमध्ये पाणी घुसले. त्यातील 98 घरे पूर्णपणे वाहून गेली. या कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची रोख मदत देण्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली होती. मात्र, अशा पुराच्या घटनेनंतर महापालिकेस केवळ घर बांधणीसाठी पत्रे, वासे तसेच बांबू देता येतात. रोख पैसे देता येत नाहीत. रोख मदत केवळ राज्यशासनाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. त्यामुळे महापालिका नेमकी मदत कशी देणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासनाने या बाबत विधि विभागाकडून अभिप्राय मागविला होता. त्यावर वस्तू रूपाने मदत देता येणार असल्याचे अभिप्रायात स्पष्ट केले होते. त्यानुसार, या नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत अल्पमुदतीची 3 दिवसांची निविदा राबवून या बाधितांना प्रत्येकी 11 हजारांचे संसारपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे साहित्य दिवाळी सुरू होण्यापूर्वी या बाधितांना वाटप करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

दिवाळीपूर्वी देणार साहित्य
याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाधितांना दैनंदिन जीवनासाठी लागणारे ताट, वाट्या, कप, चमचे, पातेली, लहान मोठे-डबे, ग्लास, तांब्या, डिश, पळ्या अशा वेगवगेळ्या साहित्यांसह प्रत्येक कुटुंबासाठी चार अंथरून आणि चार पांघरून दिले जाणार आहेत. शुक्रवारपासून दिवाळी सुरू होत असल्याने त्यांना दिवाळीपूर्वी हे साहित्य देण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून त्यानुसार तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)