‘त्याच्या’ शिक्षणासाठी प्रशासन करणार मदत

डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांची माहिती : कैदी, नातेवाईकांसाठी गळाभेट उपक्रमाचे आयोजन

येरवडा – कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी प्रशासनाकडे मदत मागावी, त्यांच्या शिक्षणासाठी कारागृह प्रशासनाकडून नक्‍कीच मदत केली जाईल, असे आश्‍वासन कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ. भुषणकुमार उपाध्याय दिले आहे. “सुधारणा आणि पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे मुख्य काम असून त्याकरीता कारागृह विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. येरवडा कारागृह येथे कैद्यांच्या नातेवाईकांसाठी “गळाभेट’ या कौटुंबिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानिरीक्षक उपाध्याय यांनी ही माहिती दिली.

यावेळी डॉ. उपाध्याय म्हणाले, कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा म्हणून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्यांना देखील त्यांच्या कुटुंबियांना भेटून आनंद वाटतो. कारागृहातील एकाकीपणाची मानसिकता दूर व्हावी व आपल्या प्रियजनांना भेटून आनंद मिळावा यासाठी राज्यभरातील कारागृहांमध्ये ” गळाभेट’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे कैद्यांच्या मानसिकतेत बदल होत असून त्यांच्यात नक्‍कीच परिवर्तन होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमामुळे कैद्यांचे नातेवाईक कुटुंबिय देखील आनंदीत आहेत.

रागाच्या भरात अनावधनाने अपराध घडून जन्मठेपेसारखी शिक्षा भोगताना त्या कैद्यांना आपण नक्‍कीच मोठी चूक केली याची जाणीव होते. गुन्हा केल्यामुळे शिक्षा भोगताना कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्यामुळे अत्यंत भावुक वातावरणात एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा वातावरणात कैदी आपल्या मुलांना आणि कुटुंबियांना भेटत होते. तर दुसरीकडे काही मुलांना देखील आपल्या वडिलांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले. येरवडा कारागृहात पाच, दहा, चौदा वर्षांसह जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी “गळाभेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून सुमारे 200 हून अधिक कैद्यांनी आपल्या मुलांना भेटून आनंद व्यक्त करीत संवाद साधला. यावेळी येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार, उपअधिक्षक कौस्तुभ कुर्लेकर, दिलीप वासनिक यांच्यासह तुरूंग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)