त्यांना बागडू द्या…

मुकुंद फडके

एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात म्हणजे वैशाख वणव्याचे दिवस असले तरी याच काळात शालेय परीक्षा संपलेल्या असतात आणि मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना उन्हाळी शिबीराचे वेध लागले असतात. कधी एकदा परीक्षा संपतेय आणि आपण पोराला एखाद्या कलावर्गात पाठवतोय असे पालकांना वाटत असते. खरेतर गेले अनेक महिने अभ्यास आणि परीक्षेच्या तणावाने शिणलेल्या विद्यार्थ्यांच्या मनाला आणि शरीरालाही विश्रांतीची गरज असतानाच या उन्हाळी शिबीराचा विषय समोर येतो. उन्हाळी शिबीरात मुलांना पाठवणे गैर नसले तरी हा निर्णय मुले आपणहून घेतात का हा संशोधनाचा विषय ठरु शकतो. पालकांनी लादलेल्या एखाद्या शिबीराला मुलगा किती उत्साहाने आणि आनंदाने जाईल हाही महत्वाचा विषय आहे.

आमिर खानच्या गाजलेल्या थ्री इडियट चित्रपटातील संदेश किती पालक आणि मुले आचरणात आणतात याचाही गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. पालकांच्या दबावाला बळी न पडता आपल्याला पाहिजे तेच करण्याचे मुलांचे स्वातंत्र्य संकुचित होउ लागले आहे. मुलांना त्यांना हवे ते करु द्यात हा साधासोपा संदेश मागे पडला आहे आणि पालकांना वाटते तेच मुलांना करावे लागत आहे. सगळ्याच पालकांना आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावे असे वाटत असते. पण देशी खेळातही तेवढेच नाव कमावता येते याचा अनेकांना विसर पडताना दिसतो. साधारण 30 वर्षापुर्वी मे महिन्याची सुटी लागली की मुलांना मुक्तपणे वावरायला मिळायचे. मुले दोन वेळा घरात जेवायला आली तरी इतर वेळ ती काय करतात याचे पालकांना देणे घेणे नसायचे. विहीरीत पोहणे, झाडावरील कैऱ्या पाडणे, जांभळाच्या झाडांचा शोध घेत फिरणे यातच मुलांचा दिवस जात असे. डोक्‍यावर मटका घेउन येणाऱ्या कुल्फीवाल्याकडूक वडाच्या पानावर कुल्फी खाणे आणि आईसक्रीम पार्लरमधील आईसक्रीम खाणे याची तुलना होउ शकत नाही. गेल्या पिढीतील मुलांचे उन्हाळी शिबीर असे अनौपचारिकच असे. पण या दिनक्रमान त्यांना शिकायला भरपूर मिळे.

मामाच्या गावाला जाण्याच्या परंपरेनेही एका पिढीला बरेच काही शिकवले होते. आता मात्र चित्र पुर्णपणे बदलले आहे. सध्याच्या उन्हाळी शिबीरात मुलांना अनेकवेळा कृत्रिमपणे काही गोष्टी शिकवल्या जाताता. पण पुर्वीच्या पिढीने भर उन्हात जरंडेश्‍वर, अजिंक्‍यतारा किंवा यवतेश्‍वरला जाण्याचा जो अनुभव घेतला आहे तो त्यांना आयुष्यभर पुरला आहे. त्या नैसर्गिक शिबीरांनी त्या पिढीला कणखर बनवले आहे. काळ बदलला त्याप्रमाणे पिढीही बदलत असल्याने उन्हाळी शिबीरे आणि कलावर्गाची नवीन संस्कृती तयार होणे अपरिहार्य आहे. पण या नवसंस्कृतीलाही स्पर्धेचा वास असल्याने मूळ उद्देशच साध्य होउ शकत नाही. परीक्षेची स्पर्धा संपता संपता या उन्हाळी शिबीराची स्पर्धा जिंकण्याचा ताण मुलांवर येता कामा नये. मुलांना मुक्तपणे बागडू देणे महत्वाचे आहे. एकेकाळी सातारा नगरवाचनालयाचा बालविभाग मे महिन्यात मुलांनी भरुन गेलेले असायचा. आता वाचन करणे हा किती पालकांचा आणि मुलांचा उन्हाळी सुटीतील दिनक्रम असेल याचा शोध घ्यावा लागेल. वर्षातील दीर्घकाळ शाळेच्या वेळापत्रकात अडकलेल्या मुलांना आता त्यातून बाहेर काढायला हवे. डोळ्यावर झोप असतानाही शाळेत जाण्याचा दिनक्रम पार पाडणाऱ्यांना आता उन्हाळी शिबीराच्या वेळापत्रकात अडकवून ठेवण्याची गरज नाही.महिना दीड महिन्याने पुन्हा शाळेचे रुटीन सुरु होणार आहेच. तोपर्यंत त्यांना मुक्तपणे बागडू देण्याची हीच वेळ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
6 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)