… त्यांच्या मरणालाही हद्दीचे बंधन

संजय कडू

पुणे – राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यातील रेल्वे स्थानकावर भटक्‍या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. रेल्वे स्थानक परिसरात तसेच बाहेर दिवसभर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यक्ती रात्री स्थानक परिसरात अथवा ससून रुग्णालयालगतच्या पदपथावर राहतात. वर्षानुवर्षे त्यांचा वावर रेल्वे प्रशासन व बंडगार्डन पोलिसांच्या हद्दीत असतो. आजार व वयामुळे या भटक्‍या व्यक्ती रस्त्यावरच मृतावस्थेत सापडतात. मृत्यूनंतरही त्यांना यातना भोगाव्या लागतात. कारण, त्यांच्या मरणालाही हद्दीचे बंधन घातले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वेच्या हद्दीत मृत झालेल्यांचे शव अनेकदा बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढकलले जाते. तर बंडगार्डन पोलीस रेल्वेच्या हद्दीत रहाणार व्यक्ती आपल्या हद्दीत मृत झाल्याने वैतागलेले दिसतात. यामुळे अनेकदा मृतदेह काही दिवस रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेला दिसतो.

पुणे रेल्वे स्थानकातील मोकळा परिसरात अनेक भटक्‍या व्यक्ती वास्तव्यात आहेत. त्यांना दोन वेळचे भोजन अनेक स्वयंसेवी संस्था देताता. यामुळे या व्यक्‍ती स्टेशन परिसर कधीच सोडत नाहीत. येथे त्यांना खायला देणारे व भीक देणाऱ्यांचे प्रमाणाही मोठे आहे. यामुळे एकदा स्थानक परिसरात वास्तव्य केले तर ते आयुष्यभर तेथून हलत नाहीत. त्यांच्या मृत्यूही याच परिसरात होतो. त्यांच्या मृतदेहांना बेवारस घोषित केले जाते. त्यांची ओळख पटवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. मात्र मृतदेहाचा स्वीकार व अंत्यसंस्काराची जबाबदारीवरुन रेल्वे पोलीस व बंडगार्डन पोलीस ठाण्यात हद्दीचा वाद रंगतो. यातील काही मृतदेह पोलिसांना किंवा रेल्वेला कळवूनही अनेकदा दोन-दोन दिवस उचलले जात नाहीत.

घटना क्र. 1
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यांत तीन बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्या तिघांचीही ओळख अद्याप पटू शकली नाही. यातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह पुणे स्टेशन चौकीच्या बाजूलाच आढळला आहे. दि. 28 मे रोजी एक ज्येष्ठ नागरिक पोलीस चौकीकडेला बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळला होता. त्यांनी अंदाजे 65 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथे तपासणीअंती त्यास मृत घोषित करण्यात आले.

घटना क्र. 2
ससून रुग्णालयाजवळील पीएमपीएच्या बस थांब्यावर अंदाजे 55 वर्षे वय असलेला एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्यालाही ससून रुग्णालयाने तपासणीअंती मृत घोषित केले. यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांना शक्‍य झाले नाही.

घटना क्र. 3
दोन ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयामधील एका पत्र्याच्या शेडमध्ये 55 वर्षाचा एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. तो मागील काही दिवस शेडमध्ये रहात होता. त्यालाही तपासणीअंती ससून रुग्णालयाने मृत घोषित केले. या तिन्ही मृतदेहांच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते.

घटना क्र. 4
दि.24 जुलै रोजी संतोष परशुराम भोसले (40, रा.अटळी, ता.सातारा) हा फिरस्ता पायास गॅंगरिन झाल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्याची ओळख पटली असली, तरी त्याचे कोणतेही नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास अजूनही पुढे आले नाहीत.

बंडगार्डन पोलीस ठाण्यालगतच एक मृतदेह दोन ते तीन दिवसांपासून बेवारस अवस्थेत होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, माणसे नसल्याचे कारण सांगत मृतदेह उचलण्यात आला नाही. नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह उचलून रुग्णालयात नेला. इतकेच नव्हे, तर ससूनमध्ये उपचार करुन हाताला सलाईन व पोटात नळी अशा अवस्थेत एक रुग्ण ससूनच्या दाराबाहेरच रस्त्यावर पडून होता. त्याला रस्त्याच्या कडेला उचलून ठेवण्याची तसदीही पोलीस किंवा ससून प्रशासनाने घेतली नाही.
– आनंद अंकुश, कार्यकर्ता, आम आदमी संघटना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)