त्यांच्या पापामुळे तेच आत जातील

अजित पवार यांचे नाव न घेता गिरीश बापट यांनी लगावला टोला

बारामती- बारामतीकर डोळे वटारण्याच्या तयारीचे आहेत त्यामुळे त्यांना आमच्याशिवाय कोणीच नाही असे नेहमीच वाटत असते. विरोधक आता पैसे देऊन माणसे गोळा करुन मोर्चे काढत आहेत ही विरोधकांची पापेच आहेत. आम्ही कोणालाही आत घालणार नाही मात्र, त्यांच्या पापामुळे तेच आत जातील असा टोला संसदीय कामकाज मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला आहे.
माळेगाव सहाकरी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बापट बोलत होते. यावेळी पशूसंवर्धन दुग्धोत्पादन मंत्री महादेव जानकर, कृषी उत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यसभा खासदार अमर साबळे, रवी अनासपुरे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपा नेते प्रशांत सातव, बाळासाहेब गावडे, सहकार महर्षी चंदरराव तावरे, कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, उपाध्यक्ष शशिकांत कोकरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दिलीप खैरे, ऍड. जी. बी. गावडे, कार्यकारी संचालक विजय वाबळे, तानाजी थोरात, रासपचे बापुराव सोलनकर, संदिप चोपडे, राजाभाऊ देवकाते आदि मान्यवर उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले की, या सरकारच्या कारकीर्दीत 38 कोटी शेतकऱ्यांची बॅंकेत खाती उघडण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान बॅंकेत जमा होऊ लागले. सर्वसामान्य माणसांना पाच लाखाचे रुग्णालयाचे कवच, कर्जमाफी, शेतकरी विमा, जलशिवार योजना आदी महत्त्वाची कामे सरकारने केलेली आहेत. 12 लाख बोगस रेशनकार्ड निघाली असून साडेतीन लाख मेट्रीक टन धान्य वाचले आहे, यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे मात्र, त्याचवेळी बारामतीकरांना माजी सैनिक प्रश्‍न विचारू लागले आहेत, त्यामुळेच बारामतीकर हैराण झालेले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सदाभाऊ खोत म्हणाले, तसा माझा आणि बारामतीचा जवळचा संबंध आहे. मागील सरकारने एफआरपीची रक्कमच दिली नाही. सहकारी साखर कारखानदारी बुडवायची, सहकारी साखर कारखाने कर्जात काढायचे आणि स्वत:चे खासगी साखर कारखाने काढायचे. सहकारी कारखाने बळकावायचे काम ज्यांनी केले तेच आता सहकार वाचवा म्हणून ओरड करतात. आता त्यांनाच प्रश्‍न विचारा, कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला साखर कारखान्यांसाठी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज दिले. हे सरकारचे महत्त्वाचे काम आहे. ज्यांना शेतीतील कळते असे म्हणतात त्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात साखरेची निश्‍चित किंमत का केली नाही. विचारुन खोत यांनी शरद पवार यांना टिकेचे लक्ष केले. लवकरच राज्यसरकार साखरेला 32 रुपये किलो हा फिक्‍स रेट करणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकार सज्ज असून जनतेला काही अडचणी येणार नाहीत. कॉंगेस राष्ट्रवादीच्या काळात जानेवारी, फेब्रुवारीला दुष्काळ जाहिर केला जायचा हे लोकांनी अनुभवले आहे.
रंजनकुमार तावरे म्हणाले की, माळेगाव कारखाना साडेसातशे टन गाळप क्षमतेचा झाला असून कारखान्याने सात कोटीचे शेततळे ओढावून नवीन डिस्टिलरी असे नवीन चार प्रकल्प उभा केले आहेत. 137 हंगामी कामगार कमी करुन खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागच्या सरकारने एफआरपीची किंमत दिली नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच तोटा झाला. यंदा बारा लाख टनाचे गाळप उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले देशातील 29 टक्के लोक शेतमालाचे उत्पादक आहेत तर 71 टक्के लोक खाणारे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू घेता येत नाही अशी स्पष्ट कबूलीच दिली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी आतातरी सावध झाले पाहिजे. पाच रुपये दूधाचा वाढीव दर दूधसंघ आणि संस्था शेतकऱ्यांपर्यंत येऊ देत नाहीत त्यामुळे विरोधकांची खरी निती कळली आहे या सरकारने शेतीतील दलाल बंद केले आहेत.
    – अमदर साबळे, खासदार
  • केंद्र आणि राज्यसरकारने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. शेतकरी फायद्यात आलाच पाहिजे, असे राज्यसरकारचे धोरण आहे. ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकार पाठीशी उभे रहात आहे. त्यामुळेच विरोधकांकडे ओरडण्याशिवाय काहीच शिल्लक राहिलेले नाही. मागील 60 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय का झाले नाही.
    – गिरीश बापट, पालकमंत्री
  • हा जाणता राजाचा धंदा
    साखर कारखानदारी मोडीच्या भावात घालून साखर कारखाने फुकटात घेण्याचे काम काही नेतेमंडळी गेल्या दहा वर्षापासून करीत आहेत. कर्ज द्यायचे व कारखाना दिवाळखोरीत काढायचा आणि तो विकत घ्यायचा असा धंदाच जाणता राजाने मांडला आहे. असा टोला सहकार महर्षि चंदरराव तावरे यांना शरद पवारांना लगावला. तसेच राजा व्यापारी होतो तेव्हा प्रजा भिकारी होते हा सिद्धांत जाणता राजांना लागू होतो तेव्हा निराशा थांबविण्याचे काम सरकारने करावे. खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांना वजनकाट्यात खूप फसवतात म्हणून त्यासाठी वजनकाटे कारखान्याच्या बाहेर करावेत. त्यासाठी सरकारने कायदा करावा, असे आवाहन त्यांनी केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)