“त्यांच्या’ नशिबी “आयुष्यमान भारत’ कधी?

रस्त्यावरचे जीवन जगणाऱ्यांना मिळेना आरोग्य योजनांचा लाभ

पुणे – केंद्र सरकारने तळागाळापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली असली तरी रस्त्यावर राहून सिग्नलवर मागणारा आणि विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या या वर्गाला मात्र या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

रुग्णालयांपेक्षाही अंधश्रद्धा अंगारे-धुपारे, करणी आणि रूढी-परंपरांवर अधिक विश्‍वास असणारा हा वर्ग आहे. आजारी पडल्यास हे लोक केवळ तात्पुरत्या उपचारासाठी महापालिका रुग्णालयात जातात. मूळ समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष झाल्याने आजार बळावतो. आरोग्याच्या चांगल्या सवयींचा अभाव आणि व्यसनांमुळे गंभीर आजारांचे प्रमाण जास्त आहे. आजारी असूनही जवळपास 30 टक्के मुले कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार घेत नाहीत असे सर्व्हेक्षणात आढळले आहे.

एकूणातील 42 टक्के मुले सरकारी किंवा धर्मादाय दवाखान्यात उपचार घेतात आणि 25 टक्के मुले खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. सर्वसाधारणपणे आजारांमध्ये सर्दी, ताप, थंडी, खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे मुलांपैकी जवळपास 42 टक्के मुले उघड्यावर शौचास जात असल्याने डायरिया, जंत होणे असे आजार मोठ्या प्रमाणात होतात. शिवाय त्वचा आणि डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

या समाजामध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याने त्या अनुषंगाने येणारे माता बाल मृत्यू प्रमाण, कुपोषण आणि गर्भवती मातांच्या आरोग्याच्या समस्या अधिक आहेत. असे असूनही गर्भवती महिलेला पुरुष डॉक्‍टरांकडून तपासून घ्यायचे नाही आणि परंपरेनुसार घरीच प्रसूती करायची अशी अंधश्रद्धा असल्याने गर्भवतींची नियमित तपासणी केली जात नाही. तसेच धारदार काचेने नाळ कापणे, जखमांवर वर माती लावून उपचार करणे असे प्रकार केले जातात. योग्य आणि संतुलित आहार न मिळाल्याने आवश्‍यक पोषक तत्त्वांचा अभावी रस्त्यावरील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते.

रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या 35 प्रमुख वस्तींमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हे नागरिक बऱ्याचदा त्यांच्या समस्या घेऊन आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी एखाद्या संस्थेने या संदर्भात काही तक्रार किंवा मागणी केली, तर यावर तत्काळ कार्यवाही केली जाते. साधारणपणे 20पेक्षा कमी संख्या असल्यास स्थानिक रुग्णालयांतून किंवा संख्या जास्त असल्यास विविध शिबिरे आयोजित करून सुविधा पुरवल्या जातात. मुलांच्या लसिकरणासाठी महापालिकेने “व्हॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या सुरू असलेली रूबेला-गोवर मोहिमेतदेखील या मुलांना लसिकरण केले जाणार आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, मनपा.

समन्वयक – नितीन साके, पंकज कांबळे (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)