“त्यांचे’ संसार सावण्यासाठी सरसावले हात!

पिंपरी – दळवीनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीमध्ये सहाजणांचे संसार जळून खाक झाले. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सहा कुटुंबामधील 27 जण रस्त्यावर आले. त्यांच्या मदतीला आता हात पुढे आले आहेत. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने जीवनावश्‍यक साहित्य व किराणामाल भेट देत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

दळवीनगर येथे गुरुवारी (दि. 24) आग लागून झालेल्या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर सहा झोपड्या जाळून खाक झाल्या. यामध्ये या सहा कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. अंगावरील कपडे वगळता सारे काही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. छप्पर उडाले त्यात संसारही खाक झाल्याने त्यांच्या मदतीला परिसरातील रहिवासी धावून आले. कोणी त्यांच्या जेवणाची तर कोणी जुने कपडे देत त्यांचे अंग झाकण्याची सोय केली. राजकीय, सामाजिक स्तरातूनही त्यांना मदतीची आस आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर महिला राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या वतीने त्यांना जीवनावश्‍यक साहित्य व किराणामाल देऊन मदत केली. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांना घरातील नवे, जुने कपडे, भांडी, धान्य, भाजीपाला आणि इतर वस्तू भेट दिल्या. आगीच्या दुर्घटनेमुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला. या कुटुबियांना पंतप्रधान आवास योजना किंवा इतर घरकुल सारख्या प्रकल्पांतून कायमस्वरुपी घरे मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करील, असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, शीला भोंडवे, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधु पांढरकर, सुप्रिया पवार, प्रदेश सरचिटणीस मीनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे आदी उपस्थित होते.

सत्ताधारी गेले कुणीकडे?
दळवीनगर झोपडपट्टीतील आगीच्या घटनेमध्ये दोघांचे बळी गेले तर सहा जणांचे संसार उघड्यावर आले. त्यांच्या मदतीला काही स्थानिक रहिवासी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस धावून आली. मात्र, एकाच कामाचे दुसऱ्यांदा उद्‌घाटन करुन प्रसिद्धी झोतात राहणारे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी कुठे गेले, असा सवाल उपस्थित होत आहे. ही घटना घडून 48 तास उलटून गेले तरी भाजपचा एकही पदाधिकारी याठिकाणी आगीची झळ पोहोचलेल्यांच्या साधी विचारपूस करण्यासाठी गेला नाही. याबाबत दळवीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)