“त्यांचे’ संसार अद्याप वाऱ्यावर

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी येथील झोपड्या रेल्वे प्रशासनाकडून हटविण्यात आल्या. यामुळे अनेक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

पिंपरी रेल्वे स्थानकांचा प्लॅटफॉर्म अरुंद असल्यामुळे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तीन ते चार डब्ब्यांना प्लॅटफॉर्म पुरत नव्हता. त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाने लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यावर रेल्वे प्रशासनाने संबधित अतिक्रमण केलेल्या झोपडीधारकांना वारंवार नोटीसा देवून जागा खाली करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अखेर 17 नोव्हेंबरला रेल्वे प्रशासनाने पोलिसांच्या फौजफाट्यात 255 अनधिकृत घरावर बुल्डोझर फिरविला. यावेळी दगडफेक झाली होती. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता.

कारवाईमुळे घराचे छत्र हरवलेल्या सुमारे एक हजार लोकांना आता रेल्वे रुळालगत उघड्यावर थंडीच्या दिवसांत कुडकुडत राहण्याची वेळ आली आहे. या कुटूंबातील लहान मुलांना व इतर सदस्यांना डेंग़्यू, मलेरियाची लागण झाली आहे. सर्पदंश सारख्या घटना सुद्धा घडल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. निवडणुकीपूर्वी मत मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे ढूंकुनही पाहिले नसल्याचा संतापही या रहिवाशांनी व्यक्त केला. येथील रहिवासी साफसफाई, घरकाम, भंगार जमा करण्याचे काम करतात. गृहकर्ज काढून आम्ही घरे बांधली. मात्र एका दिवसात आमची घरे तोडली गेली. बॅंकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छतागृह, वीज मीटर, नळजोड आदी सुविधा दिल्या होत्या. त्या देखील हिरावल्याचे सांगताना येथील रहिवाशांना गहिवरुन आले.

रेल्वेने येथील रहिवाशाचे पुनर्वसन करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. प्लॅटफॉर्मचे कामकाज वेगाने सुरु असून दोन महिन्यांत काम पुर्ण होईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे.

रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला इंग्रजीत नोटीस पाठवल्याने आम्हाला ती समजू शकली नाही. कारवाईच्या एक दिवस आधी हिंदीतून नोटीस देण्यात आली. मात्र पुरेसा वेळ नसल्याने आम्हाला काहीच करता आले नाही. 50 वर्षांपासून आम्ही याठिकाणी वास्तव्यास आहोत. मात्र, काही तासातच आमची घरे आमच्या डोळ्यांदेखत पाडण्यात आले. आमचे सामान ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
– पार्वतीबाई सांगले, निवृत्त सफाई कामगार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)