…”त्यांचा’ आनंदोत्सव झाला पण!

– भंडाऱ्याच्या चिखलामुळे अनेक जण घसरले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राहुल जाधव यांचा विजय झाला हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जल्लोष करताना अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय परिसरात शेकडो किलो भंडारा उधळला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे भंडाऱ्याचा अक्षरश: चिखल झाला. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या अनेक दुचाकी घसरल्या; तर अनेक पादचारी देखील घसरुन पडण्याच्या घटना घडल्या. उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. यासाठी भंडाऱ्याच्या गोण्या मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच हा जल्लोष सुरु होता. यामुळे महापालिकेसमोरील रस्त्यावर भंडाऱ्याचा सडा पडला होता. काही वेळातच पाऊस पडला आणि भंडाऱ्याचा चिखल झाला. यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरले. यात एका दिव्यांग व्यक्तीचाही समावेश होता.

अनेक जणांना पायी देखील चालणे मुश्‍किल झाले होते. महापालिका मुख्यालयाच्या आवारातच भंडारा उधळल्याने वाहनतळातील सर्व वाहने भंडाऱ्याने भरुन गेली होती. महापालिका कर्मचारी तसेच अग्निशमन दलाने हा भंडारा धुवून काढत मुख्यालयाचे आवार स्वच्छ केले. यामध्ये नाहक महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. तसेच महापालिकेत विविध कामानिमित्त आलेले नागरिक, ठेकेदार, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांना त्रासाला सामोरे जावे लागले. मिरवणुकीची दुचाकी व चारचाकी वाहने महामार्गावर उभी केल्याने मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याबाबत नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादीची कारवाईची मागणी
शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, महापौर निवडणुकीच्या विजयी जल्लोषादरम्यान सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांनी अनेकदा कायदा पायदळी तुडविला आहे. त्यामुळे या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर देखील जमाव बंदी व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले आहे. पोलिसांसमोर जेसीबी लावून महापालिका आवारात भंडारा उधळण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हुल्लडबाजी केली. त्यामुळे पालिका मुख्यालयाचे कामकाज बंद करावे लागले. एवढेच नव्हे तर उधळलेल्या भंडाऱ्यामुळे अनेक दुचाकी व नागरिक घसरुन पडले. पालिकेच्या सरकारी कामकाजात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि जमाव बंदीचा गुन्हा दाखल करण्यात यावेत. ही सर्व हुल्लडबाजी “सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानुसार कारवाईची मागणी साने यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)