तौसीफचे आत्मदहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाप- भाजप

भाजपचे अल्लाउद्दीन काझी व सलीम बागवान यांचे ट्रस्टचे शेख जहांगीर, फाळके, घुले यांच्यावर गंभीर आरोप

नगर: कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टमधील जागेतील अतिक्रमणांनी तौसीफ हाशीम शेख या युवकाने आत्मदहन करून बळी गेला आहे. या जागेतील अतिक्रमणांचा इतिहास पाहिल्यास तो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा आहे. तौसीफचे आत्मदहन हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाप आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्लाउद्दीन काझी व अल्पसंख्याक मार्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काझी व बागवान म्हणाले, “दावल मलिक ट्रस्टची जागा कर्जत शहरालगतच आहे. ही जागा खरेदी करणारे शहरातीलच आहे, असे सांगून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पाच एकर, कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन घुले यांनी 12 फेब्रुवारी 2013 मध्ये गट नंबर 752 मधील 0.72 हेक्‍टर आरपैकी 0.30 हेक्‍टर आर एवढी जागा नोटरी करून घेतली.’ त्याचबरोबरच आनंदराव तोरडमल, दामोदर अडसूळ, कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप बरबडे यांच्या मातोश्री विजय बरबडे, गजेंद्र शेवाळे आणि हेच लोक आंदोलनात सहभागी होऊन ते भरकटवत आहेत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर बिनबुडाचे आरोप केल्याचेही काझी आणि बागवान यांनी म्हटले आहे.

दावल मलिक ट्रस्टची ही जागा वक्‍फ बोर्ड मालमत्तेची असतानाही त्या जागेची ट्रस्टीने परस्पर विकण्याचा प्रकार केल्याचाही आरोप काझी आणि बागवान यांनी केला आहे. मुंबई येथे राहणारे ट्रस्टचे विश्‍वस्त शेख जहांगीर शेख इब्राहीम यांच्यावर हे आरोप केले आहेत. राजकीय लोकांना नोटरी करून ट्रस्टची जागा परस्पर विकण्याचा प्रताप शेख जहांगीर शेख इब्राहीम यांनी केला आहे. शेख जहांगीर, त्यांना जागा विक्रीसाठी मदत करणारे व नोटरी करून जागा ताब्यात घेणाऱ्या समाजकंटकांचा काझी आणि बागवान यांनी निषेध केला आहे.

तौसीफ शेख याचे आत्मदहन नसून ही हत्या आहे. या हत्येला ट्रस्टी, त्याला साथ देणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील समाजकंटक आणि हलगर्जीपणा दाखविणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. या सर्वांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, संपूर्ण 114 एकर जमीन त्यामधील शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालये वगळून राहिलेली जमीन मोजणी करून ट्रस्ट व शहरातील मुस्लिम बांधवांच्या ताब्यात द्यावी, अशीही मागणी काझी व बागवान यांनी केली आहे.


तौसीफच्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवा

तौसीफ शेख याचे कुटुंब दुखातून जात आहे. युवकाने समाजासाठी आत्मदहन केले आहे. यातून सावरण्यासाठी तौसीफच्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवा, असे आवाहन काझी व बागवान यांनी केले आहे. तौसीफ शेख याची पत्नीचे शिक्षण झालेले आहे. तिला किंवा तिच्या भावाला सरकारी नोकरीत समावून घ्यावे. घरकुल योजनेचा या कुटुंबाला आधार द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)