तो…माझ्या मनाचा चोर 

आज खूप दिवसांनी पायरीवर निवांत बसले होते त्याची वाट बघत…दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन थकलेला चेहरा, लॅपटॉप बघुन बघुन थकलेले डोळे आणि खांद्यावर नेहमीची ऑफिसच्या अपेक्षांनी भरलेली जड बॅग…या सगळयांमुळे गळून गेले होते शरीर…पण या सगळ्यांचा विसर पाडून आज मन आतूर झाले होते त्याला बघण्यासाठी, त्याच्या एका झलकेसाठी. नेहमी खिड़कीमधुनच बघते पण आज जरा जास्तच हुरहुर लावली आहे त्याने. त्याचे ते मोहून टाकणारे सौंदर्य, स्वभावाने अत्यंत शांत पण तेवढाच चंचल… एकदा इथे तर काही वेळाने दुसरीकडे, सगळ्यांचं सगळं काही शांतपणे ऐकून घेणारा असा तो… माझ्या मनाचा चोर.

ज्याच्याकडे मी माझी सगळी गुपितं सांगते. रोज मी येण्याआधी हजर असतो, शांतपणे दुरुनच बघत असतो मला, जणू वाट बघत असतो माझी,आणि माझ्या गप्पांची. कारण आता त्यालाही सवय झाली होती माझी आणि माझ्या बडबड्या स्वभावाची. पण आज आला नाहिये तो. नेहमी त्याचे ते लडीवाळपणे बघणे, न सांगता खूप काही समजून घेणे, सगळं काही ठीक होईल हे सांगणारे त्याचे ते डोळे, सगळं काही बेचैन करत होतं मला. आज एक दिवस त्याला उशीर झाला आहे तर मी त्याच्यासाठी एवढी बेचैन झालीये. तो हे रोज कसं करत असेल? कसं काय जमतं त्याला असं माझी रोज वाट बघत बसणं. पण छान वाटतं होते, त्याच्यासाठी वाट बघण्याचा आंनद घेत होते मी. पण वारंवार या आनंदावर एक भीती विरजण घालत होती ,तो येईल ना नक्की? त्याच्यामध्ये न आवडण्यासारखी एक पण गोष्ट नव्हती पण जेव्हा तो असा दिसेनासा होतो ना, तेव्हा हुरहुर लागते मनाला. वाट बघता-बघता नऊ कधी वाजले कळले सुद्धा नाही, जेवणाची वेळ झाली होती. तेवढ्यात आई खिड़कीतून डोकावून म्हणाली, “आज नाही येणार तो, अमावस्या आहे आज. आज मुक्काम दूसरीकडे आहे त्याचा, चल ये वर’ किती सहज म्हणाली आई….आज दुसरीकडे मुक्काम आहे त्याचा, पण मनाची समजूत घालता येत नव्हती. ते मन उदया नक्की येईल तो अशी आशा धरून बसून होते त्याच पायरीवर त्याची वाट बघत…

– प्राजक्ता जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)