“तो’ चिमुकला सापडतो तेव्हा…!

पिंपरी – वाकड पोलीस ठाणे येथे शनिवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास एक महिला तिचा चार वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची एकच पळापळ सुरु झाली. मात्र, हा मुलगा परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात अडकल्याचे समोर आले अन्‌ पोलिसांसह पालकांचाही जीव भांड्यात पडला.

पिंपरी येथे सात वर्षीय मुलीचे अपहरण करुन खून झाल्याची घटना ताजीच असताना वाकड येथे शनिवारी आरोस समाधान म्हस्के (वय-4, रा. सद्‌गुरुनगर, म्हातोबा नगर, वाकड) हा घराच्या परिसरातून दुपारी बारा वाजता बेपत्ता झाल्याची तक्रार आली. त्यामुळे वाकड पोलीस ठाणे खडबडून जागे झाले. मुलाच्या शोध मोहिमेसाठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पिंजण व त्यांच्या टीमने परिसरात शोध मोहीम सुरु केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परिसरात कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी हा मुलगा परिसर सोडून कोठेच गेला नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले. तसेच परिसरात कोणाची संशयीत हालचालही दिसली नाही. दरम्यान पोलिसांनी मुलाचा फोटो, त्याची माहिती “सोशल मिडीया’वर “व्हायरल’ केली व पोलिसांशी संपर्क करण्याच आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तपास सुरु असताना पोलिसांनी परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे लक्ष गेले. यावेळी पोलिसांनी तेथे बंद दरवाज्याला ठोठावले असता आतून आरोसने आतून आवाज दिला व साऱ्यांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. आरोस हा स्वच्छतागृहात गेला असता त्याने आतून कडी लावली. मात्र त्याला ती कडी नंतर काढता येत नव्हती. त्यामुळे गेल्या चार तासापासून तो तेथेच अडकून पडला होता. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले व पालकांच्या हवाली केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)