‘तो’ गौरव जिल्हातील जनतेचा

संजीवराजे नाईक-निंबाळकर : घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्‌घाटन

सातारा – सातारा जिल्ह्याला देशपातळीवर स्वच्छ जिल्हा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविले. तो गौरव जिल्ह्यातील जनतेचा, सरपंचांचा आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या अविरत कार्याचा आहे. कोणताही पुरस्कार 6 महिने किंवा वर्षभराच्या कामामुळे मिळत नाही, सातारा जिल्ह्याने गेले अनेक वर्ष स्वच्छतेचे काम केले असून त्यात सातत्य राखले. घनकचरा व्यवस्थापनात अतिशय चांगले काम केले त्यामुळे देशभर गौरव झाला, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आज केले.

-Ads-

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा ईनामदार, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना देशमुख, कमल जाधव, रेश्‍मा जाधव, अनिता चोरगे, स्वाती रांजणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, अविनाश फडतरे उपस्थित होते.

सातारा जिल्हा हागणदारी मुक्त झाला. घनकचरा व्यवस्थापनात आघाडी घेतली. काही ग्रामपंचायतींनी दिशा दर्शक काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरेल, असे काम जिल्ह्यात झाले. प्लॅस्टीक मुक्तीत शालेय विद्यार्थ्यांचा वाटा खूप मोठा असून त्यांनी आपल्या आई-वडीलांना सांगून अधिक प्रोत्साहित केले. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना ओला व सुका कचरा वेगळा करायला मदत झाली.

आज अनेक ग्रामपंचायती ओल्या कचऱ्याचे अतिशय उत्तम असे गांडूळ खत तयार करत आहे. तसेच हे काम अनेक ग्रामपंचायतींमध्ये सुरु आहे. देशात सर्वोत्कृष्ट स्वच्छ जिल्हा सातारा जिल्ह्याचा गौरव झाल्यामुळे देशातील आणि विदेशातील लोक हे काम बघण्यासाठी येतील. त्यामुळे कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनात अधिक अभिनव आणि सातत्यपूर्ण काम करावे लागेल, असे संजीव नाईक-निंबाळकर यांनी ग्रामपंचायतींच्या सरपंचांना उद्देशून सांगितले.

बरोबर एक वर्षापूर्वी बनवडी येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा सर्वदूर असा फायदा झाला हे आपण जाणतो. गेल्या एक वर्षात विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्राम विकास अधिकारी यांनी उत्तम काम केले. शाळेतील मुलांच्या माध्यमातून प्लॅस्टीक निर्मुलनावर चांगली जनजागृती झाली त्यामुळे 49 टन कचरा गोळा केला गेला.

काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील 1674 पाण्याचे नमुने एकत्र करण्यात आले आणि परिक्षणानंतर त्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. आपण शेतात जो युरिया खत टाकतो त्यातला नायट्रेट विरघळून पाण्यात जातो. पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यावर मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिरवळ गावच्या अवतीभोवतीच्या गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शिरवळ एमआयडीसीतील उद्योगांच्या बाग कामासाठी वापरता येतील या संदर्भात नियोजन झाले असून हे सांडपाणी योग्य त्या कामासाठी वापरले जाणार आहे, अशी माहिती कृषी सभापती मनोज पवार यांनी यावेळी दिली.

कचरा व्यवस्थापनात लोकांना त्यांची मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून वेंगुर्ले नगर परिषद अभ्यास दौऱ्याला गेलो असताना आपण 21 प्रकारचा कचरा वेगवेगळा करतांना पाहिले होते. अशा प्रकारे कचरा वेगवेगळा केला तर त्याचे विघटन करणे सोपे जाईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, भोसरेचे सरपंच नितीन जाधव, नागठाणे ग्रामविकास अधिकारी सतिश पवार, मल्हारपेठ ग्रामपंचायतींच्या सरपंच धनश्री भानुप्रताप कदम यांनी घनकचरा व पाणी व्यवस्थापन यावर ग्रामपंचायत करत असलेल्या कामाची माहिती दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)