तोवर सुखास अंत नाही…

नवीन वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष कसं जाईल? काळजी वाटतेय ना? खरं तर सध्याच्या काळात निराश व्हावं, काळजी वाटावी अशा अनेक गोष्टी अवतीभवती घडताहेत. पण जगात दुःखदायक गोष्टी घडत असतात, तशाच आशादायक गोष्टीही अनेक असतात. संकटं असतात, तिथे सुटकाही असते. तुम्ही केशवसुतांची “सतार’ नावाची कविता वाचली आहे? नसेल वाचली तर जरूर वाचा. ती संपूर्ण कविता म्हणजे निराशेच्या अंधःकारातून बाहेर पडून आशेच्या प्रकाशाकडे होणारा प्रवास आहे.

कवी एकदा असाच निराश झालेला असतो. ते लिहितात, “हृदयी भरल्या होत्या खंती…’ मनात खंत करीत कवी निराश मनःस्थितीत बसलेला आहे. दुःख करीत, भोवतालचा अंधार पाहात… त्याला वाटतं, जसा भोवताली अंधार आहे, तसाच आपल्याही मनात निराशेचा अंधार दाटलेला आहे. सर्वत्र निराशा आणि अंधारच आहे… बाहेरही आणि आतही! असा विचार करीत असतानाच अचानक कवीचं लक्ष आभाळाकडं जातं. तो वरती पाहतो तर काय, आकाश नक्षत्रांनी लखलखत असतं. आकाशातले ते अंधारात उजळणारे उजेडाचे दीप पाहताच त्याच्याही मनातला निराशेचा काळोख विरघळू लागतो. दुःखाची काजळी झडून जाते. कवीच्याही मनात आशेचे दीप तेवू लागतात. या बदललेल्या मनःस्थितीचे वर्णन करताना तो म्हणतो,
“वरती मग मी नजर वळविली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प, द्युती बहु…’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोपर्यंत अंधारात नजर खुपसून आपण बसलेलो असतो, तोपर्यंत आपल्याला दुसरं काही दिसणारच नाही. पण नजर उचलून आजूबाजूला, वरती पाहा तर खरं; सगळीकडे नुसताच अंधार नाहीय. नक्षत्रांच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर मग समजतं, “तम अल्प, द्युती बहु…’! अंधार थोडा आहे आणि उजेड पुष्कळ आहे. त्या उजेडाकडे तुम्ही डोळे उघडून बघायला मात्र पाहिजे.

रात्र काळोखी असली तरी ती रात्र संपून दिवसही सुरू होणारच असतो. म्हणूनच एक असं गाणं आहे, “कधी न राहील रात्र निरंतर, प्रकाश येतो रात्रीनंतर…’ फक्त ही रात्र संपेपर्यंत आपण धीरानं वाट पाहिली पाहिजे.

“काय बुआ सगळीकडे अंधारच आहे, आता कधी उजाडणार…’ अशी सारखी तक्रार करीत बसलो तर ती रात्र संपता संपणार नाही. पण सोबतीच्या साथीदारांची सुखदुःखं वाटून घेत मैफल रंगवलीत तर? हीच रात्र गोष्टीगाणी म्हणत फुलवलीत तर? रात्र कधी संपेल कळणारही नाही. म्हणून कितीही मोठे संकट आले तरी “कदाचित यातूनही काही चांगले निघू शकेल’ असे म्हणून आपली वाटचाल पुढे चालू ठेवायला हवी.

आपल्याला कसे अनुभव यावेत, हे काही आपण ठरवू शकत नाही. पण आपण इतरांचं वागणं कसं स्वीकारायचं, येणारे अनुभव किती सकारात्मकतेनं घ्यायचे हे मात्र आपल्या हातात आहे. आनंदाचा झरा आतूनच झुळझुळत राहायला हवा. असं झालं की, बाहेरच्या जगात कितीही कटु अनुभव आले तरी, तो झरा कधी कोळपून जात नाही. म्हणूनच एका कवीनं म्हटलंय,
जोवर पाऊस पडतो जगात,
वेडा मोर नाचतो वनात
तोवर सुखास अंत नाही,
माणुसकीला धोका नाही
तेव्हा मंडळी, याच आशावादानं नवीन वर्षाला आपण सामोरं जाऊ या! नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी, निरोगी आणि कार्यक्षम जावो ही शुभेच्छा!

– माधुरी तळवलकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)