तोफखान्यात दाखल होणार अत्याधुनिक तोफा

लष्कराच्या सामर्थ्यात वाढ

पुणे – लष्कराच्या तोफखान्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक प्रकारच्या दोन तोफा लष्कराच्या ताफ्यात दाखल होत आहे. बोफोर्सनंतर तब्बल 20 वर्षांनी लष्कराला नवीन तोफा मिळत आहेत. यामध्ये अमेरिकन बनावटीच्या अल्ट्रालाईट हॉवित्झर आणि कोरियन बनावटीच्या “के-9 वज्र’ या तोफांचा समावेश असून, जमिनीवर सुमारे 40 ते 45 कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक राष्ट्राच्या संरक्षण दलात तोफखाना हा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शत्रूला दूर ठेवण्यात या तोफांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र बोफोर्स तोफ खरेदीतील घोटाळा प्रकरणानंतर आजपर्यंत नव्या तोफा लष्करात दाखल होऊ शकल्या नव्हत्या. तसेच तोफखान्यातील काही महत्त्वाच्या तोफांचा कालावधी संपल्याने त्या निवृत्त करण्यात आल्या. यामुळे भारतीय लष्कराचा तोफखान्यात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती, इतकेच नव्हे तर लष्करी कार्याचा सर्व भार हा बोफोर्स तोफांवर येत होता.

याच पार्श्‍वभूमीवर लष्करात कमी वजनाच्या आधुनिक तोफा असाव्यात अशी मागणी गेली अनेक वर्षे होत होती. ही मागणी लक्षात घेत, संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्यातर्फे अमेरिकेशी झालेल्या करारानुसार अल्ट्रालाईट हॉवित्झर (एम777) तोफा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच कोरियन बनावटीच्या “के-9 वज्र’ या तोफा लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत.

लष्करात दाखल होणाऱ्या या अत्याधुनिक आणि कमी वजनाच्या तोफांमुळे लष्कराची गेली 20 वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याबरोबरच लष्कराची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे सैन्य दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

तोफखान्यात नव्याने दाखल होणाऱ्या या तोफांचे अनेक भाग भारतातच बनविण्यात आले आहेत. यामुळे शस्त्रास्त्र निर्मितीदेखील भारतीय सैन्य सक्षम आहे, याची ग्वाही मिळते. भारतीय लष्कराला गेल्या 30 वर्षांपासून आधुनिक तोफांची गरज होती. दरम्यान, झालेल्या सरकारने बोफोर्स प्रकरणामुळे नवी शस्त्रे खरेदी केली नाही. याचे गंभीर परिणाम भारताच्या सुरक्षेवर झाला. मात्र या तोफांमुळे लष्कराला अधिक बळ मिळणार आहे.
– लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (नि.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)