…तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही ! डॉ. सुजय विखे यांची कार्यकर्त्यांवर खप्पा मर्जी

राहाता, (तालुका प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्‍य मिळत नाही तोपर्यंत राहात्यात कुणाचाही सत्कार स्वीकारणार नसल्याचे डॉ. सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. राहात्यात नवीन पदाधिकारी नियुक्त करून काम करणाऱ्यालाच यापुढे संघटनेत स्थान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता येथील कातनाल्यावरील गणेश बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जेजूरकर वस्तीवर घेण्यात आली. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, माजी नगराध्यक्ष सोपानराव सदाफळ, कैलास सदाफळ, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष साहेबराव निधाने, विरोधी पक्ष गटनेते विजय सदाफळ, सोसायटी अध्यक्ष गंगाधर बोठे, स्वप्निल गाडेकर, बाजार समिती संचालक भाऊसाहेब जेजूरकर, नानासाहेब बोठे, चांगदेव गिधाड, वीरभद्र देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुनील सदाफळ, नगरसेविका सविता सदाफळ, मनीषा बोठे, सुमन वाबळे, सुरेखा मेहेत्रे, शालिनी जेजूरकर, सलीम शहा, ऍड. शिवराम गाडेकर, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले, “”पालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास केला. कधी कामात मागे पडलो नाही. विकासाची कामे जलद गतीने करूनही निवडणुकीत पालिकेचा जो निकाल लागला तो पाहून वाईट वाटले. पालिका निवडणुकीनंतर नाराज होतो म्हणून आलो नाही. मात्र, आता नाराजी सोडली आहे. राहात्यातील जनतेने मला कार्यमुक्त केले. आता नवीन संघटन तयार करणार असून कार्यकर्त्यांची खूप गर्दी होत असल्याने आपले कोण व विरोधक कोण हे समजत नाही. संघटनेत काम करणाऱ्यालाच यापुढे संधी देणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना संघटनेसाठी काम करण्यास वेळ नाही त्यांनी खुशाल बाजूला जावे. त्यांच्या जागी तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)