…तोपर्यंत उजनीला हात लावू देणार नाही

पळसदेवला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांचा इशारा

बिजवडी- कृष्णा -भीमा स्थिरीकरण प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या हक्‍काचे पाणी कोणी नेणार असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. या प्रकल्पाचे नाव खरे “कुंभी -कासारी -कृष्णा -कोयना’, असे होते. त्याचे नाव बदलून नीरा-भीमा स्थिरीकरण, असे करण्यात आले आहे. जोपर्यंत हे पाणी येत नाही. तोपर्यंत उजनीच्या पाण्याला हात लावू दिला जाणार नाही. असा निर्वाणीचा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
पळसदेव (ता. इंदापूर) येथे उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नदी जोड प्रकल्पाचे काम व उजनीचे पाणी मराठवाड्याला जाणार असल्याच्या अनुषंगाने उजनीलगतचा धरणग्रस्त शेतकरी मेळाव्यात मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप, अंकुश पाडुळे, कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, माजी सभापती रमेश जाधव, दीपक जाधव, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, हनुमंत बनसुडे, शरद काळे, पिंटू काळे, भूषण काळे, करमाळ्याचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत सरडे आदी उपस्थित होते.
नीरा- भीमा नदी जोड प्रकल्प व उजनीचे हक्‍काचे पाणी मराठवाड्याला कसे जाऊ शकते, याविषयी माहिती देताना पाटील म्हणाले, सध्या मराठवाड्याला जाणाऱ्या बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी 3 हजार 600 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भूम, परांडा, उस्मानाबाद, चौटालापर्यंत पाणी जाणार आहे. कुंभी -कासारी प्रकल्पाचे पाण्याचे नियोजन झाले नसताना हा घाट कशासाठी? असा खडा सवाल त्यांनी यावेळी केला.
नदी जोड प्रकल्पाचे सात किलोमीटर बोगद्याचे काम झाले आहे. त्यामुळे आगामी काळात धरणग्रस्तांवर मोठे संकट ओढावणार आहे. उजनीची पातळी 492 मीटर आहे. तर बोगद्याची खोली 487 मीटर आहे. यावरून उजनीचे सगळेच पाणी मराठवाड्याला जाऊ शकते. वेळीच आपण जागे झालो नाही तर उजनी जलाशयाची परिस्थिती भीमा नदी किंवा वाळवंटासारखी होईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.
उजनीसाठी जमीनी देऊन अनेक शेतकरी भूमिहीन झाले. त्यामुळे आमच्या हक्‍काच्या पाण्याला कदापिही धक्‍का लावून दिला जाणार नाही. आगामी काळात इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह कर्जत, करमाळा, दौंड, माढा येथील शेतकऱ्यांसह तीव्र लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • शेतकरी भावनाविवश
    मेळाव्यात काळेवाडी येथील धरणग्रस्त शेतकरी तानाजी काळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. उजनीचे पाणी आगामी काळात राहिल की नाही, याविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. यावरून बोगद्यातून मराठवाड्याला उजनीद्वारे जाणाऱ्या पाण्याची कल्पना येते. आगामी काळात पश्‍चिम महाराष्ट्रविरुद्ध मराठवाडा असा पाण्याचा वाद पेटणार, हे निश्‍चित आहे.
  • इंदापूर तालुक्‍यात काही लोक निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी खोट्या माहितीच्या आधारावर बातम्या प्रसिद्ध करीत आहेत. तोच त्यांचा बुद्यांक आहे. अशा महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास तर कितीतरी लांबची गोष्ट. आंदोलन सुरू होते. आणि संपायच्या आत तर फोटो बातमीला टाकून रिकामे, अशी आंदोलने म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेली आंदोलने अशा शब्दात विरोधकांना टोला लगावला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)