तोटा झालेल्या बॅंकांचे शेअर कोसळले 

शेअर निर्देशांकांत घट : कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम 
मुंबई – कर्नाटक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बॅंकांचा तोटा वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. या देशांतर्गत कारणाबरोबररच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शेअरबाजारात विक्री होऊन निर्देशांकांत घट झाल्याचे दिसून आले. उत्तर आणि दक्षिण कोरियातील चर्चा थांबली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि उत्तर कोरियातील चर्चेतून अंग काढून घेऊ असे दक्षिण कोरियाने सांगितल्यानंतर जागतिक बाजारातील वातावरण नकारात्मक झाल्याचे दिसून आले.

काही मोठ्या बॅंकांनी चोैथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला आहे. त्यात तोटा वाढलेला आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक अनेक बॅंकांवर कारवाई करीत आहे. बॅंकांच्या मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. या कारणामुळे मोठ्या बॅंकांच्या शेअरच्या भावात आज मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. कालही मुंबई शेअर बाजारातील वातावरण या कारणांमुळे अस्थिर होते. आज मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 156 अंकांनी कमी होऊन 35387 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंकांनी कमी होऊन 10741 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले.

देशात आणि परदेशातील राजकीय परिस्थिती खराब झाली असतानाच या आठवड्यात महागाई वाढल्याची आणि चालू खात्यावरील तूट वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. एप्रील महिन्यात चालू खात्यावरील तूट 13.7 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या महिन्यापासून रुपया कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. कालही या गुंतवणूकदारांनी 518 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 231 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केल्यामुळे निर्देशांकांची फार मोठ्या प्रमाणात काल हानी झाली नाही. आजही रुपयाचे मूल्य फार घसरले नाही त्याचबरोबर क्रूडचे दर कमी झाल्यामुळे निर्देशांकांची मोठी हानी टळली.

तोट्याचा ताळेबंद सादर केलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेचा शेअर 12.5 टक्‍क्‍यांनी कमी झाला. त्याचबरोबर नफादायक ताळेबंद सादर करणाऱ्या एचयुएलचा शेअर 3.84 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले.
– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)