तैपेई चीन बॅडमिंटन स्पर्धा : जयराम उपान्त्यपूर्व फेरीत, सौरभचे आव्हान संपुष्टात

तैपेई: भारताचा युवा खेळाडू अजय जयरामने येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धा मालिकेतील तैपेई चीन वर्ल्ड टूर सुपर-300 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. मुग्धा आग्रे आणि अभिषेक येलिगर या भारतीय महिला खेळाडूंचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले आहे.

व्हिएतनाम स्पर्धेत आणि व्हाईट नाईट्‌स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या अजयने डेन्मार्कच्या बिगरमानांकित किम ब्रुनचे आव्हान 21-10, 22-20 असे संपुष्टात आणताना आगेकूच केली. अजयने ही लढत केवळ 37 मिनिटांत जिंकून अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. उपान्त्यपूर्व फेरीत अजयसमोर मलेशियाच्या ली झी जिया याचे आव्हान आहे. दुसऱ्या फेरीतील आणखी एका लढतीत लीने इंडोनेशियाच्या चिको द्वि वार्डोयोचा 21-17, 21-8 असा पराभव केला. अजय जयरामने पहिल्या फेरीत जपानच्या हाशिरू शिमोनोचा कडवा प्रतिकार मोडून काढला होता.

पुरुष एकेरीतील आणखी एका सामन्यात भारताच्या सौरभ वर्माला जपानच्या रिची ताकेशिताविरुद्ध कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागला. सौरभने पहिली गेम जिंकून जोरदार प्रारंभ केला होता. परंतु ताकेशिताने अनुभवाच्या जोरावर हा सामना 19-21, 23-21, 21-16 असा जिंकून उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला एकेरीतील संघर्षपूर्ण लढतीत भारताच्या श्रीकृष्णप्रिया कुद्रावल्लीला तैपेईच्या लिन यिंग चुनविरुद्ध 21-23, 20-22 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)