तेव्हा तुम्ही काय करत होता ?

मयूर सोनावणे

राजू शेट्टीवर टीका करण्याच्या नादात सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीच्या आंदोलनात नेमक काय असतं याचे स्पष्टीकरण केले आहे. परंतु, सदाभाऊंच्या या वक्तव्यामुळे “मग! तेव्हा तुम्ही काय करत होता?’ असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास गैर काहीच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारच्या विरोधात आजवर अनेक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन आंदोलने केले. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठी नावारुपाला आली.

या संघटनेची धुरा सांभाळणारे राजु शेट्टी यांच्या जोडीला सदाभाऊ खोत यांच्यामुळे मोठा हातभार लागला आणि संघटनाही चांगली मजबूत झाली. मात्र, या दोघांचे सूत फारकाळ टिकले नाही. भाजपच्या आशीर्वादाने सदाभाऊंना मिळालेले मंत्रीपद कदाचित याला कारणीभूत असावे. मात्र, यानंतर खऱ्याअर्थाने या दोघांमध्ये उडालेल्या वादाच्या ठिणगीने आजवर चांगलाच पेट घेतला आहे. गेल्या एकदोन महिन्यांपूर्वी स्वाभिमानीने दुधाला वाढवून दर मिळावे यासाठी आंदोलन केले.

टॅंकर अडविले, दूध रस्त्यावर ओतले, या आंदोलनानंतर सरकारला दुध दरवाढीचा विचार करणे भाग पडले. या आंदोलनामुळे राजु शेट्टींची क्रेझ वाढत असल्याचे सदाभाऊंना चांगलीच झोंबली असावी, त्यामुळेच या आंदोलनावर भाष्य करताना दूधासाठी आंदोलन म्हणजे नेमकं काय असते हे आम्हाला चांगल माहिती आहे, रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात दूध किती आणि पाणी किती असते हे आम्हाला चांगला माहिती आहे, असे वक्तव्य सदाभाऊंनी केले होते.

या घटनेचा उडालेला धुरळा खाली बसतो ना बसतो तोच काल ऊसदरा विषयी केलेल्या स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर सदाभाऊ खोतांनी पुन्हा एकदा स्वाभिमानी म्हणजेच राजू शेट्टींवर तोफ डागली आहे. मात्र या तोफे राजु शेट्टी यांच्याइतकाच शेतकरीवर्ग जखमी झाल्याचे म्हणावे लागेल. त्याला कारणही तसेच आहे. स्वाभिमानीवर टीका करत असताना “स्वाभिमानी’च्या शाळेचा मी हेडमास्तर आहे असे विधान करुन खोत यांनी शेट्टींना टोला लगावलाच. त्याचबरोबर खोत असेही म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या दरासाठी पुकारलेले आंदोलन म्हणजे कारखानदारांबरोबर मिळून ठरवलेला एक फार्स होता. सर्टिफिकेट कशी निघतात ते आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.

या दोन्ही घटनांवरुन एकच निष्कर्ष निघतो. तो म्हणजे ज्यावेळी सदाभाऊ खोत स्वाभिमानीसोबत होते त्यावेळीदेखील हे सार असचं घडत होतं. मग त्यावेळी तुम्ही गप्प का होता, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी विचारायला काही हरकत नसावी. याशिवाय शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनात तुम्ही तुमचा राजकीय स्वार्थ साधत होता का? आता तुम्हाला शेतकऱ्यांचा येणारा पुळका कितपत खरा मानायचा? की तुम्हीही तेच करत आहात? शेतकऱ्यांच्या नावाने केली जाणारी आंदोलने हे खरच शेतकऱ्यांच्या हितासाठी केली जातात का? की शेतकऱ्यांच्या नावावर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी केली जातात? आंदोलन प्रसंगी पोलिसांकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल होतात.

पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जातात. यामध्ये आंदोलनाच्या अग्रभागी असणारे नेते, पुढारी कितपत दिसतात हे सांगण्याची गरज नाही. आंदोलनानंतर गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांना जामीन मिळण्यासाठी त्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो. त्यावेळी ही नेतेमंडळी कुठे असते? या प्रश्‍नांवर आता शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हणावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)