‘तेजस्विनी’चा दर रविवारी ‘हॉलिडे’

महिला प्रवाशांचा टक्का कमी असल्याने पीएमपीचा निर्णय

पुणे- जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली होती. त्याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, रविवारी सार्वजनिक सुुट्टी असल्याने महिला प्रवाशांचा टक्का कमी आहे. यामुळे मेपासून दर रविवारी तेजस्विनी बससेवेला सुट्टी देण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे.
नवीन मिडी बसच्या माध्यमातून एकूण 8 मार्गांवर 30 तेजस्विनी बसेसमार्फत 218 फेऱ्यांमध्ये ही सेवा सध्या सुरू आहे. यापूर्वी केवळ दोनच मार्गांवर ही सेवा सुरू होती. सकाळी तसेच सायंकाळी महिलांसाठी या बस उपलब्ध असल्याने महिलाही या बसला प्रतिसाद देत आहेत. दि. 8 मार्च ते 7 एप्रिल या महिनाभरात सुमारे 2 लाख 3 हजार महिला प्रवाशांनी विशेष बससेवेतून प्रवास केला आहे.

रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने महाविद्यालये, शाळा, बहुतेक कंपन्या बंद असतात. यामुळे सर्वच प्रवाशांची संख्या कमी असते. यातच रविवारी इतर बसेसना गर्दी कमी असल्याने महिला प्रवाशी रविवारी तेजस्विनी बसची वाट न पाहता मिळेल त्या बसने त्या प्रवास करतात. यामुळे रविवारी तेजस्विनी बसला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यामुळे पीएमपीएमलला बसणारा अधिकचा भुर्दंडदेखील वाचला जाणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने मेपासून दर रविवारी तेजस्विनी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पीएमपी प्रवासीसंख्या कमी असते. यातच महिलांसाठीच्या तेजस्विनी बसेसला महिलांचा प्रतिसाद तुलनेने कमी मिळतो. त्यामुळे दर रविवारी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.- दत्तात्रय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)