तृप्ती देसाईंविरोधात एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे अपंगत्त्वाची खोटी कागदपत्रे सादर करुन पदाचा उपभोग घेत असल्याचा आरोप केल्याप्रकरणी आता डॉ. चंदनवाले यांच्याकडून भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंविरोधात एक कोटी रुपयांचा आब्रुनुकसानीचा दावा केला आहे. तसेच तृप्ती देसाईंविरोधात बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीही दाखल केली आहे.

देसाई यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. चंदनवाले यांच्यावर अपंगत्वाच्या मुद्यावरून आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. आठ दिवसांत हे निलंबन झाले नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असेही जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले होते. दरम्यान, त्याच दिवशी पत्रकार परिषद घेत ही माहिती चुकीची असून कोर्टाने याबाबत 2012 सालीच माझ्या बाजूने निकाल दिल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले होते. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य पहाता डॉ. चंदनवाले यांनी बुधवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात देसाई यांच्याविरोधात तक्रार केली आहे. देसाई यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तर गुरूवारी त्यांनी पुणे येथील न्यायालयात आपली नाहक बदनामी केल्याचा एक कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. दरम्यान, रुग्णालयातील सर्व डॉक्‍टर्स, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी देसाई यांचा निषेध म्हणून गुरूवारी काळ्या फिती बांधून काम केले.

दरम्यान, याबाबत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत चंदनवाले यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. एम. पी. तांबे, डॉ. समीर जोशी, डॉ. अरूण कोवाळे, अधिक्षक अजय तावरे, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार तांबे, मार्डचे डॉ. अजय वणे, डॉ. श्रध्दा ठाकूर, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे मनोहर परमार, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नस्‌, सर्व मजदूर संघ या संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होते.

ससूनमध्ये मोठा पोलिस फौजफाटा
तृप्ती देसाई आंदोलन करतील, या तक्रारीनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. यादरम्यान काही संघटनाकडून मोर्चेही काढले गेले होते.

तृप्ती देसाई यांच्या आरोपांचा मुद्दा फार गंभीररित्या घेण्यात येणारा नसला, तरीही त्यामुळे ससूनमधील वातावरण कलुषित झाले आहे. त्यामुळेच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मी हा दावा दाखल करत आहे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)