तृप्ती देसाईंचा आता कामगार क्षेत्रात लढा

सुप्रिम कंपनीला “टाळे ठोको’ : सोमवारी आंदोलन
पिंपरी, (प्रतिनिधी) – महिलांच्या धार्मिक, सामाजिक हक्कांसाठी अग्रेसर असणाऱ्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आता कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगार क्षेत्रातही उतरल्या आहेत. रांजणगाव एमआयडीसीतील सुप्रिम ट्रिऑन प्रा. लि. कंपनीत महिला व पुरुष कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या सोमवारी (दि. 22) होणाऱ्या “टाळे ठोको’ आंदोलनात त्या सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने देसाई यांचा कामगार क्षेत्रात प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

रांजणगाव एमआयडीसीतील सुप्रीम ट्रिऑन कंपनीत 114 कायम व इतर असे एकूण 510 कामगार काम करत आहेत. इतर कामगारांमध्ये “कमवा व शिका’ व कंत्राटी कामगार तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. गेली पाच महिन्यांपासून कायमस्वरुपी कामगारांच्या वेतनात कंपनी व्यवस्थापनाकडून सातत्याने कपात केली असून, या कामगारांच्या हातात तुटपुंजे मासिक वेतन पडत आहे. श्रमिक एकता महासंघाने कंपनी व्यवस्थापनाकडे मागणीपत्र सादर करुनही व्यवस्थापनाकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

या सर्व परिस्थितीला कंटाळून महिला कामगार व कामगारांच्या पत्नी एकत्र येऊन, तृप्ती देसाई यांची भेट घेत, याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. या महिलांच्या समस्या ऐकुन घेत, या अन्यायाविरोधात साथ देण्याचे देसाई यांनी मान्य केले आहे. त्यानुसार या अन्यायाविरोधात येत्या शनिवारी सुप्रिम ट्रिऑन प्रा. लि. कंपनीवर महामोर्चा काढला जाणार असून, या मोर्चाचे नेतृत्व तृप्ती देसाई करणार आहेत.

कामगार पत्नींचा आत्मदहनाचा इशारा
याबाबत भूमाता बिग्रेडच्या वतीने अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सुप्रिम ट्रिऑन प्रा.लि.कंपनी व्यवस्थापनाला पत्र दिले असून, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा संदर्भ देत, कंपनीला सोमवारी (दि.22) टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय यावेळी कंपनी कामगारांच्या 31 पत्नींनी आत्मदहनाचा इशारा दिला असून, यावेळी एखादी अनुचित घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची असेल, असे या निवेदनात नमूद केले आहे.

सुप्रिम ट्रिऑन प्रा.लि.कंपनी व्यवस्थापनाच्या कामगारविरोधी धोरणामुळे कामगार मेटाकुटीस आले आहेत. कायमस्वरुपी कामगारांचे वेतन कपात केल्याने तुटपुंज्या रकमेत घर खर्च कसा चालवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याविरोधात येत्या सोमवारी कंपनीला “टाळे ठोको’ आंदोलन केले जाणार आहे. महिला कामगार व कामगारांच्या विनंतीवरुन यामध्ये भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील सहभागी होणार आहेत.
किशोर ढोकले, संस्थापक अध्यक्ष, श्रमिक एकता महासंघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)