तूर विक्री करणारे चार हजार शेतकरी बोगस

बॅंक खाती आणि सात-बारावरून धक्‍कादायक माहिती उघडकीस

मुंबई – शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर डाळ विकत घेऊन ती पुन्हा सरकारला विकणाऱ्या बोगस शेतकऱ्यांची आता खैर नाही. सरकारला फसविणारे असे सुमारे 4000 बोगस शेतकरी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे संशयित शेतकरी आता सरकारच्या रडारवर असून येत्या दहा दिवसांत त्यांची माहिती देण्याचे निर्देश कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले. परंतु, नोटाबंदी आणि तुरीला हमीभाव नसल्याने शेतकरी हताश झाला होता. त्यामुळे तुरीला जादा हमी भाव देऊन सरकारने ती खरेदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारने जादा भाव देत राज्यभरात तूर विक्री केंद्र सुरु करण्यात आली होती.

पण, या विक्री केंद्रावर व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विकत घेतलेली तूर पुन्हा सरकारलाच विकल्याचे बॅंक खाती आणि सातबारा उतारा पाहिल्यानंतर उघडकीस आले आहेत. अशी चार हजार संशयित व्यक्ती असल्याचे एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर यामधील सत्यता समोर येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

अनेक व्यापाऱ्यांनी विक्री केंद्र सुरु करण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करून ठेवली होती. परंतु, सरकारने विक्री केंद्रे सुरु केल्यानंतर या व्यापाऱ्यांनी हीच तूर डाळ सरकारला विकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. यामध्ये सुमारे 400 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

2 हजार 817 कोटी रुपयांचे वितरण

आता तूर खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला असून ज्या खरेदीमध्ये विसंगती आढळेल, अशा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत 3 हजार 401 कोटी रुपयांची 67 हजार 717 क्विंटल तूर खरेदी केली असून सरकारने शेतकऱ्यांना 2 हजार 817 कोटी रुपये वितरीत केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)