तूच सरिता – जीवनदायिनी

पर्वतराजीच्या एका खडकातून अगदी छोट्या प्रवाह रूपाने बाहेर पडणारी सरिता पुढे पुढे वाहत जाते. आपली ओळख बनविते. तिच्या अवखळ रुपात तिचे दोनही काठ आणि त्यातील माणसे सुखावतात. त्यांना उदंड जीवनाचा आनंद देत ती शेवटी सागराला जाऊन मिळते. नुसती मिळतेच असे नाही तर त्याच्याशी आणि त्याच्या पोटातील असंख्य लाटांशी ती एकरूप होते. स्वतःचे अस्तित्वही विसरते.

प्रत्येक स्त्री आणि ही जीवनदायिनी सरिता यांच्यात खूपच साम्य आहे. स्त्री ही सरितेसारखीच अवखळ, दुसऱ्यांना उपयोगी पडणारी आणि पोटात सारं सामावून घेणारी. आई बाबांच्या मायेच्या छत्राखाली ती लहानपण जगते. कौतुकात न्हाहते. आपल्या बाल लीलांनी ती आई बाबांनाही आनंद देते. तिचं घरभर नाचणं, पसारा करणं, गाणी गात गळ्यात पडणं, तिच्या अभ्यासाच्या वेळा, क्‍लासच्या वेळा, सांभाळणं- रात्री आईच्या कुशीत बिलगणं सर्व हवंहवंसं वाटतं. मग एखादं रोपटं जसं हळूहळू बहरतं तशी ती मोहरू लागते. मग तिचं आरशासमोर उभं राहणं, नवीन नवीन कपड्यांसाठी आग्रही असणं, तिच्या केसांच्या दोन वेण्या सोडून मोकळं होणं, मैत्रिणीत रमणं यात थोडं जबाबदारीनी तिला वाढवणं जमवावं लागतं.

मग तिचं करियर, तिच्यासाठी योग्य पर्याय शोधणं तिला त्यात मदत करणं आणि मग स्वतःच्या पायावर सर्वस्वी तिला उभी करणं ही आई बाबा म्हणून खूप समाधानाची गोष्ट असते. आता सरिता म्हणून ती पूर्णपणे वाहायला लागली असते. तिच्या असण्याने आसपासचा परिसर सुखावित असतो. ही सरिता आता एका सागराला मिळणार या कल्पनेनं काठावरची मंडळी व्याकूळ होतात. पण तो क्षण येतोच आणि ही दुडुदुडू धावणारी आपली लेक दुसऱ्या कुणाच्या तरी घरात

स्वतःच्या पायाने माप ओलांडून, त्या घरात आपले पाय रोवण्यासाठी आणिस्वतःला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी तयार होते. आपण मात्र ती तिकडे गेल्यावर तिच्या खोलीत तिने ठेवलेले जुने कपडे, खेळणी, तिची पुस्तकं, तिचं ड्रेसिंग टेबल, तिची बॅडमिन्टनची रॅकेट, तिची आवडीची पेटी यांना कुरवाळत, डोळ्यातील आसवे एकमेकांपासून लपवित, आनंद व्यक्त करतो. ही सरिता- एक स्त्री-जीवनदायिनी, आनंददायिनी, अशीच आहे. नुकत्याच झालेल्या “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या’ निमित्ताने या सरितेची ही छोटीशी आठवण-

महिला दिन साजरा करणं म्हणजे नक्की काय तर महिलानी साधानी असणं, घरातल्या लोकांनी, सहकाऱ्यांनी तिच्यावर प्रेम करणं, तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा, स्वप्न साकार करणं, कधीतरी पाठीवर हात ठेवून तिचं कौतुक करणं, कधीतरी खूप दमतेस आता जरा आराम कर म्हणणं, तिच्यासाठी अचानक गजरा आणणं, कधीतरी तिला आवडणाऱ्या नाटकाची संगीत कार्यक्रमाची तिकीट काढून देणं, तिच्या मैत्रिणी, तिच्या माहेरच्या माणसांविषयी आपुलकी दाखवणं, आणि जमलंच तर ती जशी मिसळून गेली आहे, आजपर्यंत वर्षानुवर्षे आपल्या घरकुलासाठी, मुलांसाठी, आपल्या माणसांसाठी राबते आहे याची थोडीशी जाणीव ठेवणं फार काही नाही हो सरितेला फक्त वाहताना सरळ वाट हवी असते पुढे जाण्यासाठी.

– आरती मोने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)